शेरीनाल्याचे सांडपाणी पुन्हा कृष्णा नदीत
By शीतल पाटील | Published: August 22, 2023 07:02 PM2023-08-22T19:02:19+5:302023-08-22T19:02:40+5:30
सांगली महापालिकेचे दुर्लक्ष : प्रदुषणात वाढ
सांगली: शहरातील शेरीनाल्याचे सांडपाणी पुन्हा एकदा कृष्णा नदीत मिसळू लागले आहे. त्यामुळे कृष्णेच्या प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. महापालिकेने तातडीने सांडपाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.शेरीनाल्यातील सांडपाणी धुळगावमधील शेतीला देण्याची योजना राबविण्यात आली.
पण ही योजना आता फोल ठरली आहे. कृष्णा नदीकाठी बंधारा बांधून तेथून तीन मोटारींद्वारे सांडपाणी उचलण्यात येत होते. हे सांडपाणी वाहून नेण्यासाठी विष्णू घाटापर्यंत पाईपलाईन टाकण्यात आली आहे. तेथून मोठी गटार काढून त्यात पाणी सोडले जात आहे. त्यातच आता शेरीनाल्यातून सांडपाणी थेट नदीपात्रात जात आहे. या नाल्यातून लाखो लिटर दूषित पाणी पात्रात जात आहे.
सांडपाणी नदीपात्रात जात असल्याने कृष्णा नदीच्या प्रदुषणात वाढ होणार आहे. त्यात सध्या कोयनेतून पाणी सोडण्यात न आल्याने आयर्विन पुलाजवळ पाण्याचा साठा करण्यात आला आहे. याच पाण्यात सांडपाणी मिसळत आहे. महापालिकेचे जॅकवेल बायपास पुलाच्या वर असले तरी नदीत पाणी साठलेले असल्याने नागरिकांना दुषित पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.