लैंगिकतेबाबत समाजात मोकळेपणाने चर्चा झाली पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:36 AM2021-06-16T04:36:48+5:302021-06-16T04:36:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : लैंगिकतेबद्दलची चुप्पी सोडली पाहिजे. कुटुंबात, समाजात याबाबत मोकळेपणाने चर्चा झाली पाहिजे. समलैंगिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : लैंगिकतेबद्दलची चुप्पी सोडली पाहिजे. कुटुंबात, समाजात याबाबत मोकळेपणाने चर्चा झाली पाहिजे. समलैंगिक संबंधांना समजून घेऊन अशा व्यक्तींना सन्मानाने जगण्याचा दिलेला अधिकार मान्य करायला हवा, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री डॉ. राणी बंग (गडचिरोली) यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने आयोजित ‘गुंफू हातामध्ये हात, फुलू पुन्हा एकसाथ’ विषयांतर्गत राज्यस्तरीय ऑनलाईन व्याख्यानमालेत ‘काय बाय सांगू, कसं ग सांगू’ या विषयावर त्या बोलत होत्या.
डॉ. बंग म्हणाल्या, बाईचा जन्म सहन करण्यासाठी आहे, असे मानणे, हे सर्वांत मोठे सामाजिक प्रदूषण ठरते. उत्क्रांतीच्या टप्प्यावर पुरुषाचा मेंदू हा स्रीच्या मेंदूपेक्षा ११ टक्क्यांनी मोठा असला तरी सूक्ष्म विचार करणे, निर्णय घेणे, तर्क करणे, संशोधन करणे अशा बाबतीत स्त्रीचा मेंदू हा ११ टक्क्यांनी पुरुषाच्या मेंदूपेक्षा अधिक प्रगल्भ आहे, असे संशोधनाअंती सिद्ध झालेले आहे. त्यामुळे स्त्रियांचा मेंदू अधिक परिपक्व असून, सूक्ष्म हालचालींचा अर्थ लावण्याची क्षमता स्त्रियांमध्ये अधिक असते. म्हणून स्त्री ही पुरुषाच्या तुलनेत तसूभरही कमी नाही, तिनेही स्वत:ला कमी लेखू नये. मासिक पाळी ही अपवित्र, विटाळ आहे हीच मोठी अंधश्रद्धा आहे.
त्या म्हणाल्या, नववधूची कौमार्य चाचणी ही अत्यंत विकृत, किळसवाणी आणि मानहानीकारक प्रथा आपल्या समाजात आज ही रूढ आहे. तिला आपण विरोध केला पाहिजे. नीतीचे नियम स्त्री-पुरुष दोघांसाठी सारखे असले पाहिजेत. आधुनिकतेच्या नावाखाली स्त्रियांमध्ये वाढलेले व्यसनाचे प्रमाण खेदजनक आणि चिंताजनकही आहे.