घाटमाथ्यावर दुष्काळाची छाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:01 AM2017-08-21T00:01:38+5:302017-08-21T00:01:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यावरील घाटनांद्रे, तिसंगी, गर्जेवाडी, वाघोली, कुंडलापूर, जाखापूर व कुची परिसरात वरुणराजाच्या अवकृपेमुळे पाण्याची आणि चाºयाची भीषण टंचाई जाणवत असून, पावसाळा मध्यावर आला तरी एकही दमदार पाऊस न झाल्याने, या परिसरातील तलाव, बंधारे, ओढे, नाले, विहिरी कोरड्या ठणठणीत पडल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यातील खरीप हंगाम पूर्ण वाया जाण्याच्या मार्गावर आहे. पाऊसच झाला नसल्याने नैसर्गिकरित्या उपलब्ध होणारा चाराही तयार झालेला नाही. त्यामुळे भीषण पाणी व चाराटंचाई जाणवू लागली आहे.
खरीप हंगाम पूर्ण वाया जाण्याच्या मार्गावर असून जून महिन्यात झालेल्या तुरळक पावसाच्या ओलीवर बळीराजाने मोठ्या धाडसाने पेरा केला. पिके चांगली तग धरु लागली. परंतु तद्नंतर पावसाने पाठ फिरविल्याने पिके करपू लागली असून, सध्या पावसाऐवजी कडक ऊन पडत असल्याने पूर्ण पिके वाया जाऊ लागली आहेत. त्यामुळे बळीराजावर अस्मानी संकट कोसळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. घाटमाथ्यावर शिवारात पिके करपू लागली आहेत.
पाण्याची ऐन पावसाळ्यात तीव्र टंचाई जाणवू लागली असून ऐन पावसाळ्यात घाटनांद्रे, जाखापूर, कुची वस्ती भागात टॅँकरने पाणी पुरवठा होत आहे. टॅँकर हे गेल्या वर्षभरापासून सुरु असून, या पट्ट्यात कुची वगळता कुठेही सिंचन योजनेचे काम झालेले नाही. पाच गावांसाठी मंजूर असणारी घाटनांद्रे उपसा सिंचन योजना निधीअभावी रखडली असून घोषणेशिवाय कोणतीही ठोस कारवाई याबाबत झाली नाही. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची असणारी वाघोली प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना बंद असल्याने वाघोली, गर्जेवाडी, कुंडलापूर येथे पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
या पट्ट्यातील पाणीप्रश्न कायमस्वरुपी मिटण्यासाठी वरिष्ठ पातळीवर केवळ घोषणा करतात, पण स्थानिक पातळीवरील नेते याबाबत कोणतेही नेतृत्व करण्यास तयार होत नाहीत, ही दुर्दैवी बाब आहे. याबाबत ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे.
सरकारकडून जनतेची केवळ चेष्टा
घाटमाथ्यावरील जनता प्रखर दुष्काळाला तोंड देत असताना, टेंभू योजनेचे केवळ गाजर दाखवून चेष्टा केली जात आहे. या प्रश्नाचा केवळ राजकारणासाठी वापर केला जात असून, आज जवळजवळ एक वर्षापासून या भागातील जाखापूर, कुची व घाटनांद्रे भागास पिण्यास योग्य नसणारे पाणी टॅँकरने पुरविले जाते. त्या पाण्यास वास येतो. त्याचबरोबर वाघोली प्रादेशिक योजना बंद असल्याने वाघोली, गर्जेवाडी, कुंडलापुरात भीषण पाणीटंचाई आहे. चाºयाविना जनावरे दगावत असतानाही त्याचे शासनाला गांभीर्य नाही. गेली दोन वर्षे पिके वाया गेली तरीही त्याची खोटी आणेवारी लावल्याने पीक विमा मिळाला नाही. त्यामुळे शासकीय अधिकाºयाने वस्तुस्थितीची जाणीव ठेवून काम करावे व जनतेची चेष्टा थांबवावी, असे कॉँगे्रसचे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांनी सांगितले.