नगराध्यक्षांनी चमकोगिरीचा उद्योग बंद करावा -- शहाजी पाटील, दादासाहेब पाटील : इस्लामपुरातील विकासकामावरून राजकारण पेटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 11:54 PM2018-02-17T23:54:58+5:302018-02-17T23:55:48+5:30
इस्लामपूर : नगराध्यक्षांनी आमदार जयंत पाटील यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करीत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील व उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी गेल्या ११ महिन्यांत विकासाचा
इस्लामपूर : नगराध्यक्षांनी आमदार जयंत पाटील यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करीत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील व उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी गेल्या ११ महिन्यांत विकासाचा कोणताही नवीन प्रस्ताव न तयार करता केवळ कूटनीतीचे राजकारण करणारे नगराध्यक्ष स्वत:चा टीआरपी वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा टोला शनिवारी पत्रकार बैठकीत मारला.
इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केलेल्या आरोपांना पाटील यांनी जोरदार उत्तर दिले. याप्रसंगी राजरामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्राम पाटील उपस्थित होते.
ते म्हणाले, जयंत पाटील यांनी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या मेडिकल कॉलेजला विरोध केला असेल, तर त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलला लोकनेते राजारामबापू पाटील यांचे नाव का दिले? त्यांना आपल्या संस्थेत वेळोवेळी नेऊन कार्यक्रम का केले? आ. पाटील यांच्या १५ वर्षांच्या काळात बगलबच्चांचाच विकास झाला, असे म्हणता; मग आपणही त्या काळात त्यांचे एक खंदे कार्यकर्ते होता. आपला विकास त्यांच्या माध्यमातूनच झाला काय?
शहाजी पाटील म्हणाले, आ. जयंत पाटील जर अडवणुकीचे, दबावाचे, इतरांना त्रास देण्याचे राजकारण करीत असते, तर वाळवा तालुक्यातील जनतेने त्यांना सलग सहावेळा आमदार म्हणून निवडून दिले असते का? गेल्या ३५ वर्षांत त्यांचे नेतृत्व तळहातावरील फोडाप्रमाणे जपले असते का? त्यांचा स्वभाव, कामाची पद्धत केवळ वाळवा तालुक्यासच नव्हे, तर जिल्हा व राज्याला माहीत आहे. आपण त्याची काळजी करू नका. आ. पाटील यांनी कारखाना, बँक, दूध संघ, सूतगिरणी, आदी सहकारी संस्था स्थापन केलेल्या नाहीत, हे खरे आहे. मात्र, त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या संस्थांमध्ये पारदर्शी व काटकसरीने कारभार करीत या संस्थांची मोठी वाढ झाली आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात ‘आम्ही तालुक्यातील जनतेस गुलामगिरीतून मुक्त केले’ असे वाळवा तालुक्यातील स्वाभिमानी व क्रांतिकारी जनतेचा अपमान करणारे विधान केले होते. याबद्दल त्यांना बोलू द्या, तुम्ही त्यांची वकिली कशाला करता?
आकडेवारी चुकीची...
नगराध्यक्षांनी इस्लामपूरच्या विकासकामांची दिलेली आकडेवारी चुकीची व दिशाभूल करणारी आहे. त्यांच्या कार्यकाळात वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मंजूर झालेल्या दोन कोटी रुपयांशिवाय कोणताही निधी शासनाकडून आलेला नाही. नगरपालिकेत असलेली ठेव व शिलकीची रक्कम रुपये ५२ कोटी आमच्या काळातीलच आहेत. त्याच्यात तुमचे कर्तृत्व काय, असा टोलाही त्यांनी दिला.