शहाबाजचा मृत्यू वीज तोडताना
By admin | Published: December 13, 2015 11:47 PM2015-12-13T23:47:49+5:302015-12-14T00:03:45+5:30
वळसंग येथील प्रकार : केवळ पाचशे रूपयांसाठी जीव गमावला
जत : तालुक्यातील वळसंग येथील शहाबाज हजरत मुल्ला (वय २५) याचा विजेचा शॉक बसून मृत्यू झाला नसून, भीमाण्णा अण्णाप्पा तेली (वय ५८) व त्यांचा मुलगा अनिल भीमाण्णा तेली ( ३०, रा. दोघे वळसंग, ता. जत) यांनी पवनऊर्जा निर्माण कंपनीकडून आर्थिक मोबदला मिळविण्यासाठी पाचशे रुपयांचे आमिष दाखवून त्याला विद्युत पोलवर चढवून विद्युत जनित्र उडवून संपूर्ण वीज पुरवठा खंडित करत असताना शॉक बसून त्याचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे.
याप्रकरणी भीमाण्णा व त्याचा मुलगा अनिल यास जत पोेलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वळसंगपासून दोन किलोमीटर अंतरावर तेली मळा आहे. तेथे भीमाण्णा अण्णाप्पा तेली व मलकारी अणाप्पा तेली यांची समाईक शेतजमीन आहे. शेतजमिनीच्या समाईक बांधावरून पवनऊर्जा निर्माण कंपनीच्या मुख्य विद्युत वाहिनीचे खांब व त्यावरून वीज वाहिनी गेली आहे.
यासंदर्भात संबंधित पवनऊर्जा निर्माण कंपनीच्या व्यवस्थापनाने मलकारी तेली यांच्याबरोबर करारपत्र करून त्यांना आर्थिक नुकसानभरपाई दिली आहे. ही नुकसानभरपाई भीमाप्णा तेली याला मिळाली नाही, त्यामुळे ते स्वत: व त्यांचा मुलगा अनिल पवन ऊर्जा निर्माण कंपनीवर चिडून होते.
१ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्यादरम्यान शहाबाज मुल्ला यास पाचशे रुपये देतो, असे आमिष दाखवून त्यास तेली मळ््यातील बांधावर नेले. नायलॉनच्या दोरीला लोखंडी हुक लावून ती वीज वाहक तारेवर टाकण्यात आली. तेथील तीन वीज वाहक तारा दोरीने एकत्र बांधून संपूर्ण वीज पुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न करत असताना, तारा अचानक खाली आल्या व बांधावर उभा असलेल्या शहाबाज मुल्ला याचा त्या तारांना स्पर्श होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर मुल्ला हे शेतात गेले असता, विजेचा शॉक लागून अचानक मृत्यू झाला आहे, अशी फिर्याद सुरुवातीस जत पोलिसात दाखल करण्यात आली होती.
विद्युत खांबावरून खाली आलेल्या वीज वाहक तारा, लोखंडी हुक, नायलॉनची दोरी घटनास्थळी पडली होती. यासंदर्भात गावात उलट-सुलट चर्चा सुरू होती. पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी घटनेची सखोल चौकशी केली असता, भीमाण्णा तेली व त्यांचा मुलगा अनिल या दोघांनी शहाबाज यास पैशाचे आमिष दाखवून विद्युत खांबावर चढविले व संपूर्ण वीज पुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न करत असताना शॉक बसून त्याचा मृत्यू झाला आहे, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी शहाबाज याची आत्या आशाबी गुलाब मुल्ला (वय ५०, रा. वळसंग, ता. जत) यांनी जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी याप्रकरणी भीमाण्णा व अनिल यास अटक करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. टी. इंगळे यांच्यासमोर उभे केले असता, सुरुवातीस दोन दिवस पोलीस कोठडी व त्यानंतर न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. (वार्ताहर)
सर्वसामान्यांचा बळी : प्रशासनाचे दुर्लक्ष
पवनऊर्जा निर्माण कंपनीची वीज वाहिनी किंवा विद्युत पोल एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामधून जात असतील तर, कंपनीचे दलाल आणि शेतकऱ्यांना लॉटरी लागली, असे येथे मानले जाते. परंतु कंपनी व्यवस्थापन, शेतकरी व दलाल यांच्या भांडणात सर्वसामान्यांचा बळी जाऊ लागला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.