शहीद कोळी कुटुंबीय आर्थिक मदतीपासून वंचित

By admin | Published: May 22, 2017 11:22 PM2017-05-22T23:22:45+5:302017-05-22T23:22:45+5:30

शहीद कोळी कुटुंबीय आर्थिक मदतीपासून वंचित

Shaheed Koli family deprived of financial help | शहीद कोळी कुटुंबीय आर्थिक मदतीपासून वंचित

शहीद कोळी कुटुंबीय आर्थिक मदतीपासून वंचित

Next


अमोल कुदळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दुधगाव : दुधगाव (ता. मिरज) येथील शहीद जवान नितीन कोळी यांचे कुटुंबीय भाजपच्या आर्थिक मदतीपासून अद्याप वंचित राहिले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी दिलेल्या मदतीच्या आश्वासनाचा त्यांना विसर पडल्याने दुधगाव ग्रामस्थ व कोळी कुटुंबियांतून नाराजीचा सूर उमटत आहे.
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा सेक्टरमधील माछील भागात सीमेवर गस्त घालत असताना दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात नितीन कोळी यांना २८ सप्टेंबर २0१६ रोजी वीरमरण आले. त्यांच्या पश्चात पत्नीसह आई, वडील, देवराज व युवराज ही दोन लहान मुले, भाऊ असा परिवार आहे. या कुटुंबाला स्वत:ची एक गुंठाही जमीन नाही.
शहीद जवान नितीन कोळी यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी, कोळी कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले होते. परंतु या आश्वासनाला आता ८ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. तरीही अद्याप कोळी कुटुंबियांना कसलीही मदत मिळालेली नाही. त्यामुळे दुधगाव ग्रामस्थ व कोळी कुटुंबियांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, भाजपकडून मिळणाऱ्या मदतीबाबत शहीद जवान नितीन कोळी यांच्या वडिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशी केली. मुख्यमंत्र्यांनीही, नेमके काय झाले याची चौकशी करतो, असे आश्वासन देऊन काढता पाय घेतला आहे. त्यामुळे ही आर्थिक मदत मिळणार का नाही? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
जयंतरावांनी शब्द पाळला
शहीद जवान नितीन कोळी यांच्या अंत्यसंस्कारावेळी माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी श्रीमती कोळी यांना रयत शिक्षण संस्थेत शिक्षिका म्हणून नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. ते त्यांनी अवघ्या महिन्याभरातच पूर्ण केले. विशेष म्हणजे दुधगाव येथील शाळेतच त्यांना नोकरीची संधी मिळाल्याने, ग्रामस्थ व त्यांच्या कुटुंबियांतून समाधान व्यक्त होत आहे.
शहीद जवान नितीन कोळी यांना घरच्या परिस्थितीमुळे बारावीनंतर शिकता आले नव्हते. त्यामुळेच त्यांनी पत्नी संपत्ती यांना जास्तीत जास्त शिकविण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचे शिक्षण बी.ए. बी.एड्. झाले आहे. त्यामुळेच श्रीमती संपत्ती कोळी यांना नितीन कोळी यांच्या पश्चात शिक्षक म्हणून नोकरी मिळण्यास कोणतीही अडचण आली नाही.

Web Title: Shaheed Koli family deprived of financial help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.