शहीद नितीन अनंतात विलीन

By admin | Published: November 2, 2016 12:28 AM2016-11-02T00:28:35+5:302016-11-02T00:28:35+5:30

साश्रूनयनांनी निरोप : दुधगावमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Shaheed Nitin merges with infinity | शहीद नितीन अनंतात विलीन

शहीद नितीन अनंतात विलीन

Next

सांगली/दुधगाव : ‘शहीद जवान नितीन कोळी अमर रहे...’ ‘भारत माता की जय’... ‘देश का बेटा कैसा हो, शहीद नितीन कोळी जैसा हो’... अशा गगनभेदी घोषणांनी व साश्रूनयनांनी शहीद नितीन कोळी यांना सोमवारी अखेरचा निरोप देण्यात आला. दुधगाव (ता. मिरज) येथे वारणा नदीकाठी सकाळी साडेदहाला शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) व पोलिसांनी हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. नितीन कोळी अनंतात विलीन झाले असले तरी त्यांचे वीरमरण देश कधीही विसरणार नाही, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
शुक्रवारी रात्री सीमेवर गस्त घालत असताना जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याशी झालेल्या चकमकीत नितीन कोळी यांना वीरमरण आले होते. तिरंग्यात लपेटलेले नितीन कोळी यांचे पार्थिव सोमवारी सकाळी साडेसात वाजता दुधगाव येथे आणण्यात आले. ते प्रथम त्यांच्या घरी नेण्यात आले. वडील सुभाष कोळी, आई सुमन, पत्नी संपदा, भाऊ उल्हास, मुले देवराज व युवराज यांनी अंत्यदर्शन घेतले. कुटुंबीयांचा विशेषत: आई व पत्नीचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. दहा-पंधरा मिनिटांनंतर पार्थिव कर्मवीर चौकात अंत्यदर्शनासाठी नेण्यात आले. तेथे दुधगाव, कवठेपिरान, माळवाडी, सावळवाडी, समडोळी, बागणी, आष्टा या पंचक्रोशीसह जिल्हाभरातून आलेल्या लोकांनी नितीन कोळी यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून दर्शन घेतले. अर्ध्या तासानंतर कर्मवीर चौकातून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. सजविलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीत पार्थिव ठेवले होते. बीएसएफचे जवान व कोळी यांचे नातेवाईक पार्थिवासोबत होते. अंत्ययात्रेच्या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूस रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. रस्त्यावर फुलांची सजावट करण्यात आली होती. प्रत्येक चौकात श्रद्धांजलीपर फलक लावण्यात आले होते. अंत्ययात्रेच्या मार्गावर महिला, आबालवृद्धांनी पार्थिवावर फुलांचा वर्षाव केला. चावडी कार्यालय, गाझी गल्ली, अरिहंत कॉलनी या मार्गावरून अंत्ययात्रा दुधेश्वर मंदिरामार्गे वारणा नदीकाठी पोहोचली. या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूस गावातील विविध सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मानवी साखळी तयार केली होती.
वारणा नदीकाठावरील स्मशानभूमीत नितीन कोळी यांचे पार्थिव आणण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी, खा. संजयकाका पाटील, आमदार जयंत पाटील, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, विलासराव शिंदे, दिनकर पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख कृष्णकांत उपाध्याय, मिरजेचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार शरद पाटील, निवासी नायब तहसीलदार शेखर परब, सीमा सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक चंदनशिवे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल प्रदीप ढोले, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रणजितसिंह सूर्यवंशी, शिवसेनेचे बजरंग पाटील, दुधगावच्या सरपंच सुरेखा आडमुठे, नितीन कोळी यांचे वडील सुभाष कोळी, आई सुमन, पत्नी संपदा, भाऊ उल्हास, मुले देवराज व युवराज यांच्यासह पंचक्रोशीतील हजारोंच्या जनसमुदायाने नितीन कोळी यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. बीएसएफ, जिल्हा प्रशासन व पोलिस पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. भाऊ उल्हास कोळी यांनी नितीन कोळी यांच्या अंत्यसंस्काराचे विधी पार पाडले. मुलगा देवराज (वय ४ वर्षे) याने मुखाग्नी दिला. (प्रतिनिधी)
वडिलांकडे तिरंगा सुपूर्द
शहीद जवान नितीन कोळी यांचे पार्थिव घेऊन बीएसएफचे जवान मध्यरात्री दोन वाजता इस्लामपुरात दाखल झाले. सकाळी सहा वाजता ते दुधगावला येण्यास निघाले. तिरंग्यात लपेटलेले पार्थिव बीएसएफच्या वाहनातून आणण्यात आले. आठच्या दरम्यान गावात पार्थिव आणताच ग्रामस्थांनी ‘नितीन कोळी अमर रहे’, अशा घोषणा दिल्या. स्मशानभूमीत चितेवर पार्थिव ठेवण्यापूर्वी बीएसएफच्या जवानांनी नितीन कोळी यांना लपेटलेला तिरंगा काढून वडील सुभाष कोळी यांच्याकडे सुपूर्द केला.
नदीकाठ घोषणांनी दणाणला
‘अमर रहे, अमर रहे, नितीन कोळी अमर रहे’... ‘पाकिस्तान मुर्दाबाद’... ‘पाकिस्तान को जलादो’... ‘जब तक सूरज-चाँद रहेगा, नितीन तेरा नाम रहेगा’... ‘भारत माता की जय’... ‘देश का बेटा कैसा हो, नितीन कोळी जैसा हो’... अशा गगनभेदी घोषणांनी नदीकाठ दणाणून गेला होता. अंत्यसंस्कार होणाऱ्या परिसरात बॅरिकेटस् लावण्यात आले होते. यावेळी महिलाही मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. लोक मिळेल तेथे जागा पकडून बसले होते. दुधगाव-खोची पुलाच्या बाजूला टेकडावरही शेकडो लोक थांबले होते. मुलगा देवराज याने मुखाग्नी दिल्यानंतर उपस्थितांचे डोळे पाणावले होते.
 

Web Title: Shaheed Nitin merges with infinity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.