लढत राहा, मी पाठीशी ठाम : नरसय्या आडम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 12:06 AM2020-02-12T00:06:10+5:302020-02-12T00:09:16+5:30
सांगलीत स्टेशन चौकात नागरिकत्व कायद्यांविरोधात सुरु असणा-या वसंतबाग आंदोलनात ते बोलत होते. ते म्हणाले, जुने दाखले कब्रस्तानमधून आणायचे काय, असा प्रश्न आहे. मी आमदार असताना तत्कालीन युती सरकारला प्रश्न विचारला,
सांगली : तरुणांना रोजगार देण्याऐवजी मोदी-शहांचे सरकार गरिबांच्या मागे लागले आहे. त्यांनी आणलेल्या नागरिकत्वविषयक कायद्यांविरोधातील लढा शांततेत सुरु ठेवा. शाहीनबाग म्हणजे दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कामगारनेते नरसय्या आडम (मास्तर) यांनी केले.
सांगलीत स्टेशन चौकात नागरिकत्व कायद्यांविरोधात सुरु असणाºया वसंतबाग आंदोलनात ते बोलत होते. ते म्हणाले, जुने दाखले कब्रस्तानमधून आणायचे काय, असा प्रश्न आहे. मी आमदार असताना तत्कालीन युती सरकारला प्रश्न विचारला, मुंबईत बांगलादेशी किती आहेत? गृहमंत्री गोपीनाथ मुंडे म्हणाले होते, फक्त दोन आहेत. तीच अवस्था देशाची आहे. मोदी-शहा मोजक्या लोकांसाठी देशाला हैराण करायला निघाले आहेत. देशासाठी तुमचे किती लोक शहीद झालेत? असा त्यांना माझा प्रश्न आहे.
नोटाबंदी, तीन तलाक, ३७० कलम, राम मंदिर या सर्वबाबतीत मुस्लिम गप्प बसले. पण आता नागरिकत्व कायद्यावेळी देशातील १३० कोटी जनता विरोधात एकवटली आहे. केरळ सरकारने हा कायदा चालणार नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. ७० लाख लोक ६२० किलोमीटर रॅलीद्वारे तिरंगा घेऊन निघाले. विरोध केला. देशातील ३२ लाख गरीब लोक एकवेळच्या अन्नावर जगत आहेत. दरवर्षी ७० लाख बालकांचा जन्मत:च मृत्यू होत आहे. यावर उपाय करण्याऐवजी जाती-धर्माचे राजकारण सुरू आहे .
तरुणांना रोजगार दिला तरच देश पुढे जाईल. अमित शहांच्या मुलाची संपत्ती एका वर्षात ८० हजार कोटींवर गेली, पण आमचे तरुण नोकºया नसल्याने आत्महत्या करत आहेत. सरकार त्यांच्या मागे लागले आहे. सरकारला सुबुद्धी द्यावी, अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो.
या लढ्यात हिंदू, मुस्लिम, दलित सगळेच सामील आहेत. या लढ्यात लढताना मला गोळी लागली तरी मृत्यूचे मी स्वागत करतो. दिल्लीत मतदारांनी काल निकाल दिला आहे, आता देशातील १३० कोटी जनता निकाल देईल; मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येणार नाही. अमित शहांना वाटते, पोलीस हातात आहेत. पण जनता ठोकल्याशिवाय राहणार नाही. आणीबाणीमुळे जनतेने इंदिरा गांधींचे सरकारही उलथवले होते हे लक्षात घ्यावे. देशात जाती-धर्माच्या नावावर यापूर्वी कधीही शासन चालले नव्हते. ९० कोटी लोकांकडे १९५१ पूर्वीचे पुरावे नाहीत. त्यांना तुरुंगात डांबणार काय? शांततेत लढा सुरु ठेवा, मी पाठीशी आहे, असेही ते म्हणाले.
आमच्या हाती घटना
आडम मास्तर म्हणाले, काल कोणी तरी तलवारीला तलवार, दगडाला दगडाची भाषा केली. पण आमच्या हातात तलवार, दगड काहीही नाही. बाबासाहेबांनी दिलेले संविधान, महात्मा गांधींचा तिरंगा व शहीद भगतसिंगांचा ‘इन्कलाब’चा नारा आहे.