शहीद उमाजी पवारांना साश्रुनयनांनी निरोप

By admin | Published: December 4, 2014 12:47 AM2014-12-04T00:47:33+5:302014-12-04T00:49:21+5:30

शासकीय इतमामात वडगावात अंत्यसंस्कार : केंद्रीय राखीव दलाच्या ३५ जवानांकडून मानवंदना

Shahid Umaji Pawar's message to the sarashunayana | शहीद उमाजी पवारांना साश्रुनयनांनी निरोप

शहीद उमाजी पवारांना साश्रुनयनांनी निरोप

Next

तासगाव : छत्तीसगड राज्यात राजापूरजवळ सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले वडगाव येथील जवान उमाजी शिवाजी पवार (वय २३) यांच्या पार्थिवावर आज दुपारी वडगावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘अमर रहे! अमर रहे! उमाजी पवार अमर रहे!’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. जमलेल्या शेकडो ग्रामस्थांनी उमाजी पवार यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला.
दुपारी शहीद उमाजी पवार यांचे पार्थिव केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या रुग्णवाहिकेतून वडगावात आणण्यात आले. सोबत केंद्रीय राखीव दलाच्या ३५ जवानांचे पथक होते. गावात पार्थिव घेऊन आलेल्या गाड्यांचा प्रवेश होताच तरुणांनी ‘अमर रहे’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तिथेच बहुतांशी ग्रामस्थांनी दर्शन घेतले.
ग्रामस्थांनी फुलांच्या माळांनी सजविलेल्या ट्रॅक्टरमध्ये उमाजी पवार यांचे पार्थिव ठेवून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. थोड्या अंतरावर रामपूर वस्ती भागात शहीद पवार यांच्या निवासस्थानापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यांच्या घरी गावातील महिलांनी मोठी गर्दी केली होती. शहीद पवार यांची आई विजया, बहीण सुनीता, वडील शिवाजी व धाकटा भाऊ मुरारजी यांना जमलेले लोक धीर देत होते. पण उमाजी पवार यांच्या जाण्याच्या वेदना त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होत्या.
कुटुंबियांनी दर्शन घेतल्यानंतर पुन्हा अंत्ययात्रा जाखापूर रस्त्यावरील माळावर नेण्यात आली. तिथे अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली होती. शासनाच्यावतीने प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार राजेंद्र शेळके, पोलीस अधीक्षक दिलीप सावंत, उपअधीक्षक अनिकेत भारती, निरीक्षक रमेश बनकर, केंद्रीय राखीव पोलीस दलातील कमांडंट पुरुषोत्तम यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी ग्रामस्थांनीही पुष्पहार घालून अंत्यदर्शन घेतले.
केंद्रीय पोलीस दलाच्यावतीने तसेच जिल्हा पोलिसांच्यावतीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून अखेरची मानवंदना देण्यात आली. भाऊ मुरारजी यांनी भडाग्नि दिला. पवार यांच्या मित्रांचे डोळे पानावले. (वार्ताहर)

Web Title: Shahid Umaji Pawar's message to the sarashunayana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.