शाहीर आदिनाथ विभूते यांचे निधन
By श्रीनिवास नागे | Published: January 16, 2023 05:01 PM2023-01-16T17:01:16+5:302023-01-16T17:03:12+5:30
महाराष्ट्र, कर्नाटकसह भारतातील बहुतांश ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांत त्यांनी शाहिरी कलेचा ठसा उमटविला होता.
सांगली - बुधगाव (ता. मिरज) येथील शाहीर सम्राट आदिनाथ बापूराव विभूते (वय ५३) यांचे रविवारी (दि. १५) रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. शाहीर सम्राट, शाहीर विशारद बापूराव विभूते यांचे ते पुत्र होत. वडिलांप्रमाणेच पहाडी आवाज लाभलेल्या आदिनाथ विभूते यांनी वयाच्या सातव्या वर्षापासूनच वडिलांसोबत शाहिरीत पदार्पण केले.
महाराष्ट्र, कर्नाटकसह भारतातील बहुतांश ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांत त्यांनी शाहिरी कलेचा ठसा उमटविला होता. तसेच दुबई आणि मॉरिशसमध्येही शाहिरी कला सादर करण्याचा मान त्यांनी मिळविला होता. दहा हजारांवर शाहिरी कार्यक्रम त्यांनी केले. त्यांनी स्वत:चे सामाजिक, ऐतिहासिक, प्रबोधनात्मक २६ पोवाडे, २०० हून अधिक लोकगीते असे साहित्य लिहिले होते. केंद्र शासनाच्या साहित्यिक विभागाच्या संग्रहासाठी शाहिरी कलेवर विशेष लेखन केले होते. शिवाजी विद्यापीठात लोककलेचे मानद शिक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा शाहीर प्रसाद, सून, नातवंडे असा परिवार आहे.
राज्य पुरस्काराची खंत
शाहीर आदिनाथ विभूते यांना राज्य व परराज्यातील शेकडो पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. मानाचा समजला जाणाऱ्या राज्य शासनाच्या सांस्कृतिक पुरस्कारासाठी त्यांनी प्रस्ताव दाखल केला होता. मात्र, मागील वर्षी जाहीर झालेल्या पुरस्कारासाठी त्यांचेच बंधू अवधूत यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. आता मरणोत्तर पुरस्कार तरी द्यावा, अशी बुधगावकरांची मनस्वी इच्छा आहे.