कुस्ती, नाटकांमुळे शाहू महाराजांचे मिरजेशी नाते
By admin | Published: June 26, 2016 12:54 AM2016-06-26T00:54:00+5:302016-06-26T00:54:00+5:30
मिरजेतील बंगल्यातून आठवणींचे अस्तित्व : सर विल्यम वॉन्लेस यांच्याशी जपले मित्रत्वाचे नाते
सांगली : कुस्तीप्रेम आणि नाट्यवेड या दोन गोष्टींमुळे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे मिरजेशी नाते जुळले होते. डॉ. सर विल्यम वॉन्लेस हे त्यांचे फॅमिली डॉक्टर असल्यामुळे वारंवार उपचारासाठी यावे लागत असल्याने महाराजांनी येथे एक बंगलाही बांधला होता. मिरजेतील वास्तव्याच्या खुणाही या बंगल्याच्या निमित्ताने अजूनही ताज्या आहेत.
डॉक्टर आणि रुग्ण इतकेच वॉन्लेस आणि शाहू महाराजांचे औपचारिक नाते नव्हते. या दोघांनी शेवटपर्यंत मैत्रीचा धागाही जपला. प्रकृतीची कोणतीही अडचण असली, तरी शाहू महाराज तातडीने मिरजेला येत. येथे वारंवार यावे लागत असल्याने त्यांनी रुग्णालय परिसरातच एक बंगला बांधला. हा बंगला सध्या आरवट्टगी बंगला म्हणून परिचित आहे. या बंगल्याच्या निमित्ताने शाहू महाराजांच्या पाऊलखुणा जपल्या आहेत. शाहू महाराजांनी वॉन्लेस यांना अनेकदा स्वाऱ्या आणि शिकारीला नेले होते. ज्यावेळी वॉन्लेस रुग्णालयासाठी आणखी काही जागेची गरज होती, तेव्हा शाहू महाराजांनी त्यांना मदत करण्याचे ठरविले. सध्याच्या हॉस्पिटलसमोर असलेली लिंगायत समाजाची मोठी जमीन या मिशन हॉस्पिटलला मिळवून देण्यात शाहू महाराजांचा वाटा होता.
शाहू महाराजांशी असलेल्या मैत्रीचे नाते वॉन्लेस यांनी आत्मचरित्रात उलगडून दाखवले आहे. अनेक घटनांचा उल्लेख यामध्ये आहे. महाराजांनी अनेकदा मिरजेत उपचाराच्या निमित्ताने तसेच नाटक पाहण्यासाठी आल्यानंतर त्यांच्या बंगल्यात मुक्काम केला होता. १९०७ मध्ये मिरजेतील नाट्यगृहात लोकमान्य टिळकांसोबत त्यांनी बालगंधर्वांच्या नाटकास हजेरी लावली होती. नाटकांप्रती त्यांना प्रेम होते. त्यामुळे या माध्यमातूनही शाहू महाराजांचे मिरजेशी नाते राहिले.
कुस्तीच्या माध्यमातून येथील पैलवानांना शाहू महाराजांनी नेहमीच प्रोत्साहन दिले. कोल्हापुरात होणाऱ्या कुस्ती स्पर्धांसाठी ते येथील पैलवानांना व कुस्तीशौकिनांना निमंत्रितही करीत. त्याचबरोबर मिरजेतून कोल्हापुरात कुस्तीच्या निमित्ताने आलेल्या लोकांना ते मदतही करीत असत. कुस्ती आणि नाटक यांच्या माध्यमातून त्यांनी मिरजेला आपलेसे केले होते. (प्रतिनिधी)
पटवर्धनांना निमंत्रण
पटवर्धन संस्थांनांमध्ये कुस्तीचे शौकीन असलेले श्रीमंत गंगाधरराव बाळासाहेब पटवर्धन यांच्याशी याच खेळाच्या माध्यमातून त्यांचा संपर्क राहिला. कोल्हापुरात होणाऱ्या स्पर्धांसाठी शाहू महाराज त्यांना निमंत्रित करीत असत.