शक्तिपीठ महामार्ग विरोधकांनी सांगलीत पालकमंत्र्यांची गाडी अडवली, सरकारविरोधात जोरदार घोषणा 

By अशोक डोंबाळे | Published: June 22, 2024 05:35 PM2024-06-22T17:35:09+5:302024-06-22T17:36:20+5:30

सुरेश खाडे यांनी शासनाकडून शेतकऱ्यांच्या भावना मांडण्याचे आश्वासन

Shaktipeeth highway opponents blocked the car of the guardian minister in Sangli, strong slogans against the government | शक्तिपीठ महामार्ग विरोधकांनी सांगलीत पालकमंत्र्यांची गाडी अडवली, सरकारविरोधात जोरदार घोषणा 

शक्तिपीठ महामार्ग विरोधकांनी सांगलीत पालकमंत्र्यांची गाडी अडवली, सरकारविरोधात जोरदार घोषणा 

सांगली : शेतकऱ्यांना भूमिहीन करून महापुराचा धोका वाढविणारा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनावेळी शनिवारी पालकमंत्री सुरेश खाडे यांची गाडी अडवण्यात आली. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृतीच्या पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसचे खासदार, आमदारासंह कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी झालेल्या आंदोलनात खासदार विशाल पाटील, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, आमदार अरुण लाड, माजी मंत्री प्रतीक पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, किसान सभेचे अध्यक्ष उमेश देशमुख, नागरिक जागृती मंचचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर, डॉ. जितेश कदम, भाजपचे नेते पृथ्वीराज पवार, महेश साळुंखे, संजय हजारे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

महामार्ग स्थगित करण्याऐवजी सरकारने रद्द करावा, अशी आग्रही मागणी केली. पालकमंत्री खाडे नियोजन समितीच्या बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येत असताना अडवण्यात आले. मंत्री खाडे यांनी मोटारीतून उतरून निवेदन स्वीकारले. दरम्यान, घडलेल्या या प्रकरणामुळे पोलिस यंत्रणेची धावपळ उडाली.

महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांतून प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातील एकोणीस गावांतून जात आहे. शेटफळे, घाटनांद्रे, तिसंगी, डोंगरसोनी, सावळज, सिद्धेवाडी, अंजनी, सावर्डे, गव्हाण, वज्रचौंडे, मनेराजुरी, मतकुणकी, नागाव कवठे, कवलापूर, बुधगाव, माधवनगर, कर्नाळ, पद्माळे, सांगलवाडी इत्यादी गावांतील पाच हजार शेतकरी बाधित होत आहेत. ज्या शेतकऱ्यांची जमीन जात आहे, त्यांना जमिनीचा मोबदला अत्यंत कमी मिळणार आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तिपीठ महामार्गच रद्द झाला पाहिजे, अशी शेतकऱ्यांसह सर्वच आंदोलकांनी पालकमंत्री खाडे यांच्याकडे भूमिका मांडली.

देवही माफ करणार नाही : धैर्यशील माने

परमेश्वराच्या नावावर शेतकऱ्यांच्या जमिनीवर कोणी नांगर फिरवत असेल, तर त्यांना देवदेखील माफ करणार नाही, अशी टीका करून खासदार धैर्यशील माने यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. काँग्रेसने काढलेल्या मोर्चात सहभागी होत माने यांनी सरकारविरोधात जोरदार टीका केली. जेव्हा शेतकऱ्यांचा विषय येईल, तेव्हा सरकार विरोधात उभे राहू. शक्तिपीठ महामार्गविरोधात लोकसभेत विशाल पाटील यांच्यासोबत आवाज उठविणार, असे आश्वासनही माने यांनी शेतकऱ्यांना दिले.

महामार्ग शेतकऱ्यांवर लादू देणार नाही : विश्वजित कदम

शासनाने गोवा ते नागपूर शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन संपादन करण्याची भूमिका घेतली आहे. हा महामार्ग जाणाऱ्या १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना कोणतीच कल्पना न देता हुकूमशाही पद्धतीने हा निर्णय लादला गेला असून, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. पर्यायी रस्ते उपलब्ध असताना ८५ हजार कोटी रुपये खर्च करून कंत्राटदारांचे खिसे भरणारा हा महामार्ग शेतकऱ्यांवर आम्ही लादू देणार नाही, असा इशारा माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिला.

Web Title: Shaktipeeth highway opponents blocked the car of the guardian minister in Sangli, strong slogans against the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.