शक्तिपीठ महामार्ग रद्दसाठी २५ सप्टेंबरला सरकारचे महाळ घालणार, सांगलीत नितीन गडकरींना काळे झेंडे दाखवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 03:50 PM2024-09-19T15:50:14+5:302024-09-19T15:50:54+5:30
सांगली : शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे, या मागणीसाठी २५ सप्टेंबर रोजी राज्य सरकारचे महाळ घालून निषेध करण्यात येणार ...
सांगली : शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे, या मागणीसाठी २५ सप्टेंबर रोजी राज्य सरकारचे महाळ घालून निषेध करण्यात येणार आहे. तसेच ४ ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरीसांगलीत येणार आहेत. या दिवशी त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात येणार आहे, अशी माहिती शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीचे उमेश देशमुख यांनी दिली.
शक्तिपीठ महामार्गाबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार उलट-सुलट विधाने करून बाधित शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहेत. म्हणून महाराष्ट्र सरकारचे २५ सप्टेंबर रोजी महाळ घालण्याचा निर्णय बाधित शेतकरी प्रतिनिधींच्या बैठकीत घेण्यात आला. याचबरोबर महाराष्ट्र सरकारमधील मंत्री एका बाजूस महामार्ग रद्द झाला आहे, अशी घोषणा करत आहेत.
दुसऱ्या बाजूस मुख्यमंत्री शिंदे फक्त नांदेड, कोल्हापूरचा विरोध आहे, असे विधान करत आहेत. म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काळे झेंडे दाखविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने करून शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवला आहे. राज्यव्यापी आंदोलनात सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सहभाग होता. तरीही मुख्यमंत्री शिंदे यांना सांगलीतील शेतकऱ्यांचा विरोध दिसत नाही. या घटनेचा शेतकऱ्यांनी निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे, असे देशमुख यांनी सांगितले.
यावेळी सतीश साखळकर, प्रभाकर तोडकर, सुनील पवार, उमेश एडके, विष्णू पाटील, अभिजित जगताप, प्रवीण पाटील, श्रीकांत पाटील, यशवंत हरूगडे, सुधाकर पाटील, विलास थोरात, राजेश पाटील, विलास पाटील, धनाजी पाटील आदी उपस्थित होते.