शामरावनगर, धामणीतील नैसर्गिक नालेच गायब, ड्रोनच्या सर्व्हेत धक्कादायक चित्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 02:31 PM2022-03-21T14:31:47+5:302022-03-21T14:32:25+5:30
सांगली : कृष्णा नदीला येणाऱ्या महापुरांच्या कारणाचा शोध घेण्यासाठी कृष्णा महापूर नियंत्रण नागरी समितीतर्फे शनिवारपासून ड्रोनद्वारे पूर पट्यातील भागाचा ...
सांगली : कृष्णा नदीला येणाऱ्या महापुरांच्या कारणाचा शोध घेण्यासाठी कृष्णा महापूर नियंत्रण नागरी समितीतर्फे शनिवारपासून ड्रोनद्वारे पूर पट्यातील भागाचा सर्वे सुरू झाला आहे. हरिपूर रोडवरील नैसर्गिक नाल्यापासून शामरावनगर, धामणी, अंकली या पूरबाधित भागातील नैसर्गिक नालेच गायब झाल्याचे धक्कादायक चित्र ड्रोनच्या सर्व्हेत उघडकीस आले. या गंभीर प्रश्नाकडे महापलिका, महसूलच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
कृष्णा महापूर नियंत्रण नागरी समितीचे हणमंतराव पवार, सेवानिवृत्त अभियंता विजय दिवाण, संजय कोरे, प्रदीप वायचळ, आनंदा चोपडे यांच्या उपस्थितीत कोल्हापूर रोडवर असणाऱ्या नैसर्गिक नाल्याजवळून ड्रोनद्वारे सर्व्हेस प्रारंभ केला. शरद शिंदे यांनी ड्रोनद्वारे हा सर्व्हे केला असून छायाचित्रे, व्हिडिओ कृती समितीकडे सादर केली आहेत. त्यानंतर कृती समितीचे सदस्य, स्पंदनचे सदस्य व टेक्निकल अभ्यासक यावर अभ्यास करून अहवाल तयार करणार आहेत.
कृष्णा नदीचे पाणी हरिपूर रोडवरील लिंगायत स्मशानभूमीपासून शहरात शिरते. लिंगायत स्मशानभूमी, हरिपूर रोड, भारतनगर, कोल्हापूर रोडवरून शामरावनगर, अंकली, धामणीकडे कोणत्या मार्गाने हे पाणी सरकते. या परिसरातील मुख्य नैसर्गिक नाल्यासह उप नाल्यांवरही मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. यामुळे महापुराचे शामरावनगर, धामणी परिसरात शिरल्यानंतर परत जातच नाही. या नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणाबाबत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे मत कृष्णा महापूर नियंत्रण नागरी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
विश्रामबागला धोका
अंकलीजवळून जाणारा नागपूर ते रत्नागिरी महामार्गाला मिरज ते अंकलीपर्यंत मोठ्या प्रमाणात भराव घातला आहे. त्यामुळे शामरावनगर मार्गे धामणीहून पलीकडे जाणारे पुराचे पाण्याला मोठा अथडळा तयार झाला आहे. साहजिकच हे पाणी शामरावनगर, धामणीसह विश्रामबागमध्येही पसरू शकते. त्यामुळे विश्रामबागही महापुराच्या कचाट्यात सापडू शकते. याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे, असे मत कृष्णा महापूर नियंत्रण नागरी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मांडले आहे.