पन्नास मीटर पाइपलाइनसाठी शामरावनगर वेठीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:18 AM2021-07-02T04:18:47+5:302021-07-02T04:18:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील शामरावनगर परिसरात पावसाळी पाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. स्वराज चौक ते ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील शामरावनगर परिसरात पावसाळी पाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. स्वराज चौक ते कोल्हापूर रोड आणि कोल्हापूर रोड ते भोबे गटार, असे दोन टप्प्यात काम झाले आहे. त्यातील पन्नास मीटरच्या बंदिस्त पाइपलाइनचे काम रखडल्याने शामरावनगरमध्ये पाणी साचून राहत आहे. या परिसरातील नागरिकांनी किती वर्षे नरकयातना भोगायच्या, असा सवाल मदनभाऊ युवा मंचाचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे यांनी केला.
याबाबत त्यांनी आयुक्त नितीन कापडणीस यांना निवेदनही दिले आहे. लेंगरे म्हणाले की, शामरावनगरमध्ये पावसाळ्यात नागरिकांची दैना होते. पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले. स्वराज चौक ते कोल्हापूर रोड व भोबे गटार ते कोल्हापूर रोडपर्यंत पाइपलाइनचे काम हाती घेतले; पण चार वर्षांत हे काम पूर्ण झाले नाही. आता केवळ ५० मीटर पाइपलाइनचे काम रखडले आहे. ते पूर्ण झाल्यास शामरावनगरमधील ८० टक्के पाण्याचा निचरा होणार आहे.
यंदा पहिल्याच पावसात शामरावनगर परिसर पाण्याने तुडुंब भरलेला होता. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे जनतेला रोगराई, आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. तरी ५० मीटर काम तातडीने पूर्ण करावे, अन्यथा युवा मंचाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.