कष्टाच फळ मिळालं, शांताबाईंना मिळणार राष्ट्रपती भवनात पुरस्कार स्विकारण्याचा बहुमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2021 06:34 PM2021-11-16T18:34:49+5:302021-11-16T18:43:03+5:30

स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानात विटा नगरपरिषदेने देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. हा पुरस्कार स्विकारण्यासाठी नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, मुख्याधिकारी अतुल पाटील व अन्य पदाधिकाऱ्यांसोबत बुधवारी सायंकाळी शांताबाई विमानाने दिल्लीकडे रवाना होणार आहेत.

Shantabai Hattikar a cleaner of Ta Municipality was honored to receive the award for the cleanest brick city in the country at Rashtrapati Bhavan | कष्टाच फळ मिळालं, शांताबाईंना मिळणार राष्ट्रपती भवनात पुरस्कार स्विकारण्याचा बहुमान

कष्टाच फळ मिळालं, शांताबाईंना मिळणार राष्ट्रपती भवनात पुरस्कार स्विकारण्याचा बहुमान

googlenewsNext

दिलीप मोहिते
विटा : गेल्या ३४ वर्षांपासून हातात झाडू घेऊन शहरातील मुख्य रस्त्यांसह गल्ली बोळात साफसफाईचे प्रामाणिक काम करणाऱ्या विटा नगरपालिकेच्या ५५ वर्षीय महिला सफाई कर्मचारी शांताबाई उत्तम हत्तीकर यांना दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात देशातील स्वच्छ विटा शहराचा पुरस्कार स्विकारण्याचा बहुमान मिळाला आहे. नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, मुख्याधिकारी अतुल पाटील व अन्य पदाधिकाऱ्यांसोबत बुधवारी सायंकाळी शांताबाई विमानाने दिल्लीकडे रवाना होणार आहेत.

स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानात विटा नगरपरिषदेने देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्यामुळे देशातील पहिल्या क्रमांकाचे स्वच्छ शहर ठरलेल्या विट्याचा दि. २० रोजी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मान होत आहे. हातात झाडू घेऊन रात्रंदिवस शहराची साफसफाई करणाऱ्या आरोग्य विभागाच्या सफाई कर्मचाऱ्यांचे या यशात मोठे योगदान आहे.

त्यामुळे दिल्ली येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधीला सामावून घेण्याचा निर्णय माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी घेतला. त्यानुसार गेल्या ३४ वर्षांपासून हातात झाडू घेऊन शहरातील सर्व रस्ते चकाचक करण्यात योगदान देणाऱ्या शांताबाई हत्तीकर यांना दिल्लीच्या तख्तावर घेऊन जाण्याचे निश्चित झाले आहे.

त्यानुसार शांताबाई दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात हजेरी लावणार असून, विटा शहराचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार स्वीकारण्याच्या सोहळ्यात सहभागी होत आहेत. गेल्या ३४ वर्षांच्या प्रामाणिक व निष्ठेने केलेल्या सेवेचे फळ शांताबाईंना मिळत आहे. त्यांच्यासाठी हा भाग्याचा दिवस आहे.

देशातील सर्वात स्वच्छ ठरलेल्या विटा शहराचा दिल्लीत गौरव होत आहे. या यशात विटेकर नागरिकांचा सहभाग कदापि विसरू शकणार नाही. त्याच पध्दतीचे चांगले काम विटा पालिकेच्या सर्वच सफाई कर्मचाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे दिल्लीत होत असलेल्या सन्मान सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून शांताबाई हत्तीकर या ज्येष्ठ महिला सफाई कर्मचाऱ्याला घेऊन जाणार असल्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी सांगितले.

Web Title: Shantabai Hattikar a cleaner of Ta Municipality was honored to receive the award for the cleanest brick city in the country at Rashtrapati Bhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.