शरद पवारांनी बहुजनांच्या जिवावर राजकारण करत बहुजनांचाच घात केला, गोपीचंद पडळकरांची जहरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 04:26 PM2022-10-03T16:26:52+5:302022-10-03T16:27:26+5:30
आरेवाडीचा बन महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होणार
आटपाडी : शरद पवार नावाच्या जातीयवादी माणसानं आमचा घात केला. आजपर्यंत आमचे श्रद्धास्थान असलेल्या चौंडी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी न करणारे पवार आज चौंडी आपल्या नातवाच्या ताब्यात देण्याचा डाव खेळत आहेत. शरद पवारांनी मराठा समाजाचेही मोठे नुकसान केले, अशी जहरी टीका विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा बनामध्ये रविवारी आयोजित दसरा मेळाव्यामध्ये ते बोलत होते. यावेळी माजी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानद पडळकर, माजी महापाैर संगीता खोत, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्राजक्ता कोरे, माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, अनिल पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पडळकर म्हणाले, आरेवाडीच्या बनामध्ये होत असणारा हा दसरा मेळावा वैचारिक परिवर्तनाचा मेळावा आहे. भविष्यात राजकीय परिवर्तनाचा केंद्रबिंदू आरेवाडी होणार आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील एका नेत्याने मेळाव्याला खोडा घालण्याचा प्रयत्न केला. शरद पवार आमचे वैचारिक शत्रू आहेत. मराठा समाजालासुद्धा त्यांनी फसवले. यांना फक्त आपल्या जवळची माणसे मोठी करायची आहेत. यांना बहुजनांचा पोरगा मोठा झालेला चालत नाही. आतापर्यंत बहुजनांच्या जिवावर राजकारण करत त्यांनी बहुजनांचाच घात केला.
आरेवाडीचे बिरोबा बन म्हणजे हजारो वर्षांची संस्कृती आहे. हा सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी येथे सांस्कृतिक विद्यालय सुरू करण्याचा संकल्प आहे.
शरद पवारांनी कधीही अहिल्यादेवी याची जयंती साजरी केली नाही; परंतु माझ्यासारखा कार्यकर्ता जेव्हा अहिल्यादेवी यांच्या विचारांचा वारसा महाराष्ट्र समोर मांडतो, तेव्हा या पवार कुटुंबाला राजमाता अहिल्यादेवींची आठवण झाली. मग जयंती व पुतळा अनावरणाचे कार्यक्रम घेतले जात आहेत. मात्र, आजचा तरुण शिकला आहे. तो जाणकार आहे. त्याच्या मनामध्ये परिवर्तनाची लाट उसळली आहे.
यावेळी माऊली हलवनकर, वसंतराव कोळेकर, ढालगावचे माजी सरपंच सुभाष संकेत काळे, अजित मासाळ, बापूसाहेब मेटकरी, सुरेश घागरे, सुभाष मस्के, दादासाहेब लवटे, अजित एडगे उपस्थित होते
आरेवाडीचा बन महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होणार
आज या बिरोबाच्या बनामध्ये होत असलेल्या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आयटी सेललासुद्धा येथे चोवीस तास लक्ष ठेवावे लागत आहे. भविष्यात आरेवाडीचा बन महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होणार आहे.