अशा खूप कारवाया पाहिल्या, काय करायचंय ते करा, पवारांचं भाजपाला थेट आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 09:59 AM2019-10-02T09:59:10+5:302019-10-02T10:07:15+5:30
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी भाजपा सरकारला पुन्हा एकदा ओपन चॅलेंज दिलं आहे.
सांगलीः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी भाजपा सरकारला पुन्हा एकदा ओपन चॅलेंज दिलं आहे. इस्लामपुर - वाळवा मतदारसंघातून काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या जाहीर सभेला शरद पवार उपस्थित होते. त्यावेळी शरद पवारांनी भाजपा सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे.
शरद पवार म्हणाले, राजकारणात विरोधकांना नाउमेद करण्याचे काम होत आहे. मी शिखर बँकेचा डायरेक्टर किंवा सभासद नसतानाही ईडीच्या गुन्हेगारी यादीत माझं नाव आलं. अहो आमच्या बापजाद्यानेही कधी गुन्हेगारी केली नाही. शिखर बँकेत 70 जणांचा समावेश आहे. त्यात भाजपा, सेना यांचीसुद्धा लोक आहेत. ईडीच्या नावाने काय कारवाई करायची ती करा त्याची चिंता आम्हाला नाही, अशा खूप कारवाया पाहिल्या आहेत, असं म्हणत शरद पवार फडणवीस सरकारला थेट आव्हान दिलं आहे.
गेल्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती दिली नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे की खटला चालवा. गुन्हा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा,हे निर्देश सुप्रीम कोर्टाला द्यावे लागतात आणि आम्ही गुन्हेगार नसताना ईडीत आमचे नाव येते, ही दडपशाही नाही का?
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 1, 2019
गेल्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती दिली नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे की खटला चालवा. गुन्हा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा,हे निर्देश सुप्रीम कोर्टाला द्यावे लागतात आणि आम्ही गुन्हेगार नसताना ईडीत आमचे नाव येते, ही दडपशाही नाही का? असा सवालही त्यांनी केला. तसेच मोठया उद्योगपतींनी जी कर्ज थकवली आहेत त्यामुळे अनेक बॅंका अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने 86 हजार कोटी रुपये त्या बॅंकांमध्ये भरले आहेत. आज देशात आणि राज्यात त्यामुळे आत्महत्या वाढल्या आहेत. अशा लोकांच्या हातात पुन्हा सत्ता देणार का? असा सवाल शरद पवार यांनी जनतेला केला.
देशाच्या समोरचे महत्वाचे प्रश्न कोण मांडायला तयार नाही. निव्वळ 370 कलम, काश्मीरमध्ये काय काय केले, पुलवामा सांगतात. सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन भावनेला हात घालत आहेत. अतिरेकी कारवायांचा खात्मा करा. आमचा पाठिंबा आहे. जगात सुंदर काश्मीर आहे. गुलामनबी आझाद यांनी आज निवेदन दिल्याचे सांगतानाच काश्मीरमध्ये शांतता आहे ठिक आहे परंतु ती स्मशानशांतता आहे. दुकाने, व्यापार बंद आहेत. घरं कशी चालवायची ही चिंता तिथल्या लोकांना सतावत आहे. रस्त्यावर कोण फिरणार नाही हे बघणं म्हणजे आम्ही खुप काही कर्तृत्व केलं हे सांगणं योग्य नाही, असा टोलाही शरद पवारांनी लगावला.