विदर्भाबाबत शरद पवार भांडणे लावताहेत !
By admin | Published: October 14, 2014 12:12 AM2014-10-14T00:12:26+5:302014-10-14T00:46:52+5:30
माधव भांडारी : वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर ठाम
सांगली : वेगळ्या विदर्भाबाबत सार्वमत घेण्याची भाषा करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नव्याने भांडण निर्माण करीत आहेत, अशी टीका भाजपा प्रवक्ते माधव भांडारी यांनी सोमवारी सांगलीत केली. प्रशासकीय कामकाजाच्यादृष्टीने छोटी राज्ये असावीत, अशी भूमिका भाजपाने २५ वर्षांपूर्वीच घेतली होती. आजही ती भूमिका कायम आहे, असे सूचित करीत वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भंडारी म्हणाले की, गुजरातमधील शालेय पाठ्यपुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या चुकीच्या उल्लेखाबाबत छेडले असता, ते म्हणाले की, ही घटना आठ महिन्यांपूर्वीची आहे. तेव्हा आपण स्वत: गुजरात सरकारशी पत्रव्यवहार करून चूक लक्षात आणून दिली होती. गुजरात शासनाने हे पुस्तक मागे घेतले आहे. आता सहा महिन्यांनंतर शरद पवार यांना जाग आली आहे. केंद्रात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना एनसीआरटीच्या लाखो पुस्तकांत शिवाजी महाराजांचा इतिहास छोटा केला गेला. मुघल इतिहासाला ३५० पाने दिली होती व शिवाजी महाराजांचा इतिहास अवघ्या काही ओळीत मांडला आहे. त्यातही चुका आहेत. त्यावर पवार गप्प का होते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला़ (प्रतिनिधी)