शरद पवारांच्या अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयाने सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी हादरली; राजीनामा सत्र सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 12:05 PM2023-05-03T12:05:36+5:302023-05-03T12:22:11+5:30
सर्वच पदाधिकारी राजीनामे देतील
सांगली : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याचे पडसाद सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीतही उमटले. पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना यामुळे जबरदस्त धक्का बसला असून, पदांच्या राजीनाम्याचे सत्र जिल्ह्यात सुरू झाले आहे. आमदारांनीही पवारांच्या या निर्णयानंतर चिंता व्यक्त केली.
मंगळवारी दुपारी शरद पवारांनी निर्णय जाहीर केल्यानंतर सांगलीच्या राष्ट्रवादीत अस्वस्थता पसरली. सोशल मीडियावरील पक्षाच्या ग्रुपवर नाराजीची भूमिका मांडण्यास सुरुवात झाली. जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी क्रमांक एकवर आहे. सर्वाधिक आमदार व संस्थास्तरावर सर्वाधिक ताकद असलेला हा पक्ष असल्याने या ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. पक्षीय गोटात दुपारनंतर अस्वस्थता पसरली. अनेकांनी पक्षाच्या भवितव्याबाबत चिंताही व्यक्त केली.
यांनी दिले राजीनामे
पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी महापाैर सुरेश पाटील, तसेच प्रदेश सचिव ताजुद्दीन तांबोळी यांनी तातडीने राजीनामे देऊन शरद पवारांच्या या निर्णयाबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांच्या नेतृत्वाशिवाय पक्षात काम करणे आमच्यासाठी कठीण असेल, अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली.
सर्वच पदाधिकारी राजीनामे देतील
शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला नाही, तर जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी, तसेच बुथप्रमुखसुद्धा राजीनामे देतील, अशी भूमिका जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी मांडली.
तिन्ही आमदारांची नाराजी
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक व आमदार सुमनताई पाटील यांनीही शरद पवारांच्या या निर्णयानंतर नाराजी व्यक्त केली. त्यांनीच पक्षाचे अध्यक्षपद यापुढेही भूषवावे, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.
शरद पवारांशिवाय पक्षाची कल्पनाच करवत नाही. संपूर्ण देशात प्रभावी असणारे ते व्यक्तिमत्त्व आहेत. अन्य राज्यांमध्येही त्यांच्याबद्दल आदरभाव व्यक्त केला जातो. त्यामुळे तसे दुसरे नेतृत्व मिळणे मुश्कील आहे. त्यामुळे शरद पवारांनीच पक्षाचे नेतृत्व करावे, असा आमचा आग्रह आहे. - आमदार मानसिंगराव नाईक
शरद पवार यांचा पक्षाला मोठा आधार आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे पक्षाची प्रगती झाली आहे. अनेक नेते त्यांनी घडविले आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाची गरज आहे. त्यांनी राजीनामा देऊ नये. - आमदार सुमनताई पाटील
शरद पवारच पक्षाची ओळख आहेत. त्यांच्यामुळेच ऊर्जेने, ताकदीने नेते, कार्यकर्ते काम करतात. त्यांच्यामुळे पक्षाचे अस्तित्व आहे. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा, असा आमचा आग्रह असेल. - अविनाश पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी