पाणी धोरणासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडे एकत्रित पाठपुरावा करणार - शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 01:30 AM2017-11-04T01:30:41+5:302017-11-04T01:30:51+5:30
धरणातील पाण्याला हजार, बाराशे रुपये आणि स्वत: तयार केलेल्या पाणी संस्थांच्या योजनांसाठी चार ते पाच हजार रुपये पाणीपट्टी अन्यायकारक आहे. पाणी मिळविण्याचे धोरण निश्चित करायला हवे, त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडे एकत्रित पाठपुरावा करू, अशी ग्वाही माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी दिली.
तासगाव (जि. सांगली) : धरणातील पाण्याला हजार, बाराशे रुपये आणि स्वत: तयार केलेल्या पाणी संस्थांच्या योजनांसाठी चार ते पाच हजार रुपये पाणीपट्टी अन्यायकारक आहे. पाणी मिळविण्याचे धोरण निश्चित करायला हवे, त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडे एकत्रित पाठपुरावा करू, अशी ग्वाही माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी दिली.
कवठेएकंद (ता. तासगाव) येथे सिद्धराज सहकारी शेती पाणीपुरवठा योजनेच्या रौप्यमहोत्सवी समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आ. पतंगराव कदम अध्यक्षस्थानी होते.
पवार म्हणाले, दुष्काळी भाग, पाणीटंचाई अशा परिस्थितीतही कवठेएकंदच्या शेतकºयांनी एकदिलाने शेतीची पाणी योजना उभी केली. डोक्यावर कर्जाचा बोजा घेऊन ही पाणी योजना गेली पंचवीस वर्षे चांगली चालवली आहे. एकीकडे आम्ही शासनाने बांधलेल्या धरणातील पाणी हजार ते बाराशे रुपये पाणीपट्टी भरून वापरतो, तर दुसरीकडे स्वत: कर्ज काढून उभ्या केलेल्या पाणी संस्थेतून चार-पाच हजाराची पाणीपट्टी भरून पाणी मिळते. हे बदलायला हवे. वीज दरवाढ व पाणीपट्टी यासाठी सवलत दिली पाहिजे. बागायती शेतीतून शेतकरी संपन्न होण्यासाठी पाणी योजनांच्या प्रयत्नांना सरकारने प्रोत्साहन द्यायला हवे.
साखर कारखानदारी आॅक्सिजनवर
आज काही ठराविक साखर कारखाने सोडले, तर बाकीचे कारखाने आॅक्सिजनवर आहेत. तासगाव कारखाना बंद पडला. सांगलीसारखा मोठा कारखाना आर्थिक अडचणीत आला. कारखानदारी बंद पडल्यामुळे हजारो लोकांचे संसार अडचणीत येतात. शेतकºयांंचे नुकसान होते. त्याची काळजी घेतली पाहिजे, असे भावूक मतही पवारांनी व्यक्त केले.