मतदान यंत्रामध्ये घोळ हा शरद पवारांचा जावईशोध : देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 02:44 PM2019-05-27T14:44:31+5:302019-05-27T14:45:50+5:30
देशभरात महाआघाडीचे उमेदवार जेथे विजयी झाले, तेथील मतदान यंत्रे चांगली आणि जेथे पराभूत झाले तेथे गोलमाल, हा आरोप चुकीचा आहे. विरोधक आपले अपयश लपविण्यासाठी असा आरोप करत आहेत. जेथे पराभव झाला, त्या ठिकाणच्या यंत्रांमध्ये गोलमाल केला जात असल्याचा जावईशोध बारामतीकरांनीच लावला आहे, अशी मिश्किल टिप्पणी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी सांगलीत केली.
सांगली : देशभरात महाआघाडीचे उमेदवार जेथे विजयी झाले, तेथील मतदान यंत्रे चांगली आणि जेथे पराभूत झाले तेथे गोलमाल, हा आरोप चुकीचा आहे. विरोधक आपले अपयश लपविण्यासाठी असा आरोप करत आहेत. जेथे पराभव झाला, त्या ठिकाणच्या यंत्रांमध्ये गोलमाल केला जात असल्याचा जावईशोध बारामतीकरांनीच लावला आहे, अशी मिश्किल टिप्पणी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी सांगलीत केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी देशमुख यांनी विरोधकांकडून सुरू असलेल्या ईव्हीएमबाबतच्या आरोपावर टीका केली.
देशमुख म्हणाले की, देशातील मतदार भाजपच्या पाठीशी आहेत, हे निवडणुकीच्या निकालावरून सिध्द झाले आहे. लोकांचा सरकारवर विश्वास असल्यानेच पुन्हा भाजपला सत्ता मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. विरोधकांनी यापूर्वी केलेला कारभार देशातील सर्वसामान्य मतदारांना माहीत आहे. त्यामुळे लोकांनी पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवला आहे, असे असताना आता विरोधकांकडून मतदान यंत्राचा विषय समोर आणला जात आहे.
मतदान यंत्राबाबत आक्षेप घेऊन संपूर्ण निवडणूक प्रक्रिया बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वत:चे अपयश लपविण्यासाठी पराभवाचे खापर मतदान यंत्रावर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. यापेक्षा विरोधकांनी आपला झालेला पराभव मान्य करावा. भाजपने व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षात देशभर केलेल्या विकासकामांची पोहोच म्हणून हा विक्रमी विजय मिळाला आहे.
ज्या ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले, तेथील यंत्रे चांगली आहेत. ज्या मतदारसंघात पराभव झाला, तेथील यंत्रांमध्ये सेटिंग असल्याच्या तर्क लढवण्यात येत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात पराभव झाला, तर जनतेचा लोकशाहीवरील विश्वास संपेल, असे भाकित पवारांनी केले होते. परंतु बारामतीमध्ये राष्ट्रवादीने विजय मिळविला आहे. त्यामुळे सर्व यंत्रे चांगली आहेत, हे निकालावरून स्पष्ट झाले आहे. यावरून लोकशाही अधिक दृढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारकडून प्रशासनास सर्व त्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडूनही दुष्काळ निवारणाच्या कामांचे नेटके नियोजन करण्यात येत आहे. गरज असेल तेथे चारा छावण्या सुरू करण्याचे, तसेच पिण्याचे पाणी तातडीने पुरविण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.