इस्लामपुरात मराठा आरक्षण रद्दनंतर तरुणांचे मुंडण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:28 AM2021-05-06T04:28:19+5:302021-05-06T04:28:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर येथील मराठा समाजाच्या युवकांनी निषेध केला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर येथील मराठा समाजाच्या युवकांनी निषेध केला. निकालाचा आणि राज्य-केंद्र सरकारचा निषेध म्हणून येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर रणरणत्या उन्हात मुंडण करून घेतले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणाही दिल्या.
दिग्विजय पाटील म्हणाले, मराठा समाज मोठ्या आशावादाने न्याय्य मागण्या घेऊन रस्त्यावर उतरला आणि त्याबद्दल दिलासा देणारे कोणतेही ठोस पाऊल कोणत्याही सरकारकडून किंवा व्यवस्थेकडून उचलले गेले नाही. सरकारने मांडलेले मुद्दे सर्वोच्च न्यायालयाने नाकारले आहेत. यावर फेरविचार व्हावा आणि कोणत्या प्रक्रियेद्वारे मराठा समाजाला आरक्षण मिळेल, हे त्वरित पाहावे. समाजाची अगतिकता पराकोटीला पोहोचलेली आहे आणि अशावेळेस समाजाला वाऱ्यावर सोडणे म्हणजे राज्यकर्त्यांचा मूर्खपणा होईल. हे राज्यातल्या आणि केंद्र सरकारच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी निषेध म्हणून दिग्विजय पाटील यांनी मुंडण करून घेतले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उमेश कुरळपकर, विजय महाडिक, सागर जाधव, सचिन पवार, अभिजित शिंदे, विजय लाड, रामभाऊ कचरे, अमोल पाटील उपस्थित होते.
कोट
मराठा समाजाला न्या निर्णयाने धक्का बसला आहे. याचा अनेक पिढ्यांवर परिणाम होणार आहे. मराठा आरक्षण देण्यासारखी स्थिती राज्यात नाही, हे म्हणणे चुकीचे व निषेधार्थ आहे. आम्ही पुन्हा लढा उभा करू व आरक्षण मिळवू.
- उमेश कुरळपकर