शेडगेवाडी सराफ दुकानातील चोरीचा छडा, कर्नाटकातील चोरट्यास कुपवाडमध्ये अटक

By घनशाम नवाथे | Published: July 19, 2024 07:59 PM2024-07-19T19:59:27+5:302024-07-19T19:59:44+5:30

त्याच्याकडून ९० हजार रुपयांची सोन्याची पाटली जप्त केली.

Shedgewadi Saraf shop robbery, Karnataka thief arrested in Kupwad | शेडगेवाडी सराफ दुकानातील चोरीचा छडा, कर्नाटकातील चोरट्यास कुपवाडमध्ये अटक

शेडगेवाडी सराफ दुकानातील चोरीचा छडा, कर्नाटकातील चोरट्यास कुपवाडमध्ये अटक

घनशाम नवाथे/सांगली : शेडगेवाडी (ता. शिराळा) येथील सराफी दुकानात चोरी करणाऱ्या अबरारहुसेन गुलाबरसूल बेग (वय ३०, रा. कुडची, ता. रायबाग, कर्नाटक) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून ९० हजार रुपयांची सोन्याची पाटली जप्त केली.

अधिक माहिती अशी, तुषार लीलाचंद माळी यांचे शेडगेवाडी येथे सुप्रिम ज्वेलर्स हे सराफी दुकान आहे. दि. ५ एप्रिल २०२४ रोजी सकाळी सव्वानऊच्या सुमारास संशयित अबरारहुसेन बेग हा दुकानात आला. त्याने तुषार यांना सोन्याचे दागिने दाखविण्यास सांगितले. दागिने दाखवित असताना ड्रॉव्हरमधील सोन्याची पाटली हळूच लंपास केली. त्यानंतर अबरारहुसेन तेथून पसार झाला. माळी यांनी कोकरूड पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली होती. त्याचा तपास सुरू होता.

दरम्यान, संशयित अबरारहुसेन बेग हा कुपवाड फाटा येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने त्याला संशयावरून ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता सोन्याची पाटली मिळाली. दागिन्याबाबत विचारणा केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. कसून चौकशी केल्यानंतर शेडगेवाडीत सराफी दुकानातून चोरी केल्याची कबुली दिली. त्याला कोकरूड पोलिसांच्या ताब्यात दिले. अबरारहुसेन हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर महाराष्ट्रासह विविध राज्यात गुन्हे दाखल आहेत.

गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, कर्मचारी सागर लवटे, दऱ्याप्पा बंडगर, अमर नरळे, उदयसिंह माळी यांच्या पथकाने कारवाई केली.

Web Title: Shedgewadi Saraf shop robbery, Karnataka thief arrested in Kupwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.