सांगलीतील बेळुंकी येथे हिवराच्या झाडाच्या शेंगा खाल्याने मेंढ्यांचा मृत्यू, दोन लाखांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 03:52 PM2023-03-03T15:52:58+5:302023-03-03T15:53:11+5:30
सुदैवाने वेळीच उपचार झाल्याने बारा ते पंधरा मेंढ्या बचावल्या
गजानन पाटील
दरीबडची : बेळुंकी (ता. जत) येथे हिवराच्या झाडाच्या शेंगा खाऊन नऊ माडग्याळ मेंढ्यांचा मृत्यू झाला. सुदैवाने वेळीच उपचार झाल्याने बारा ते पंधरा मेंढ्या बचावल्या. मात्र या दुर्घटनेत मेंढपाळाचे दीड ते दोन लाख रुपये नुकसान झाले. ही घटना काल, गुरुवारी घडली.
बेळंकी येथील सचिन मच्छिंद्र सरगर, तानाजी मच्छिंद्र सरगर, प्रकाश तुकाराम चौगुले या मेंढपाळांचा एकत्रित कळप रानात चरत होत्या. यावेळी हिवराच्या झाडाच्या शेंगा खाल्ल्याने मेंढ्यांना किराळ लागले. उन्हाचा तडाखा जास्त असल्याने मेंढ्या तडपडू लागल्या. मेंढपाळ सचिन सरगर यांनी डफळापूर येथील पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ. कदम व कुंभारी येथील डॉ.सतिश राठोड यांच्याशी तात्काळ संपर्क करून घटनेची माहिती दिली.
पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत उपचार केले. वेळेत उपचारा केल्याने १२ ते १५ मेंढ्यांचा जीव वाचला. त्यामुळे मोठी आपत्ती टळली. मात्र, नऊ मेंढ्या मृत पावल्याने दीड ते दोन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. शासनाकडून संबंधित मेंढपाळास आपत्कालीन योजनेतून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी मेंढपाळ सचिन सरगर यांनी केली आहे.