शेगावला अपघातात जतचा एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:27 AM2020-12-29T04:27:01+5:302020-12-29T04:27:01+5:30
जत : जत-सांगोला रस्त्यावर शेगाव (ता. जत) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अजित नारायणराव ढोबळे ...
जत : जत-सांगोला रस्त्यावर शेगाव (ता. जत) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अजित नारायणराव ढोबळे (वय ४७, रा. लक्ष्मीनगर, पटाईत गल्ली, जत) यांचा जागीच मृत्यू झाला, तर अखिल करीम मुजावर (४८, रा. शेगाव, ता. जत) गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.
जत येथील गणेश व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेत लिपिक असलेले अजित ढोबळे मुलीला स्थळ पाहण्यासाठी पंढरपूर येथे सहकुटुंब गेले होते. घरातील इतर सदस्यांना चारचाकी गाडीतून पाठवून ते स्वतः दुचाकीवरून गेले होते. पंढरपूर येथील कार्यक्रम संपवून ते परत सांगोला येथे आले होते. कुटुंबातील इतरांना पुढे पाठवून तेथील शेतजमिनीची पाहणी करून ते पाठीमागून जतकडे येत असताना शेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ आले असता समोरून दुचाकीवरून अखिल मुजावर व त्यांची आई जन्नतबी करीम मुजावर येत होते. या दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक होऊन ढोबळे यांच्या मानेचा मणका तुटून डोक्याला जबर मार लागल्यामुळे जागीच मृत्यू झाला. अखिल मुजावर गंभीर, तर त्यांची आई जन्नतबी मुजावर किरकोळ जखमी झाल्या असून, त्यांच्यावर जत ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अखिल मुजावर व त्यांची आई अनंतपूर (ता. अथणी, कर्नाटक) येथील नातेवाइकाच्या अंत्यसंस्कारासाठी गेले होते. तेथून परत शेगाव येथे येत होते. घराजवळ आल्यानंतरच त्यांच्या गाडीला अपघात झाला. अजित ढोबळे पतसंस्थेत पंचवीस वर्षांपासून काम करत होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी व पत्नी असा परिवार आहे. सकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर जत येथे अंत्यसंस्कार करण्यात आले .
हेल्मेटअभावी गेला जीव
अजित ढोबळे व अखिल मुजावर यांनी हेल्मेट घातले नव्हते. हेल्मेट असते तर ढोबळे यांचे प्राण वाचू शकले असते आणि मुजावर गंभीर जखमी झाले नसते, अशी चर्चा आहे.
अजित ढोबळे यांचा फोटो मेल केला आहे.