शेळी-मेंढी छावण्यांची घोषणा ठरणार मृगजळ -जत तालुक्यातील परिस्थिती :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:02 AM2019-06-26T00:02:53+5:302019-06-26T00:04:53+5:30
शेळ्या-मेंढ्यांसाठी छावण्या सुरू करण्याचा आदेश ३१ मे रोजी महसूल व वन विभागाने दिला होता. याला पंचवीस दिवस उलटून गेले तरीही जत तालुक्यात शेळ्या-मेंढ्यांसाठी छावणी सुरू झालेली नाही. त्या सुरु होतील का, असा प्रश्न पशुपालकांना पडला
गजानन पाटील ।
संख : शेळ्या-मेंढ्यांसाठी छावण्या सुरू करण्याचा आदेश ३१ मे रोजी महसूल व वन विभागाने दिला होता. याला पंचवीस दिवस उलटून गेले तरीही जत तालुक्यात शेळ्या-मेंढ्यांसाठी छावणी सुरू झालेली नाही. त्या सुरु होतील का, असा प्रश्न पशुपालकांना पडला आहे.
जत तालुक्यामध्ये शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळ्या-मेंढ्यांचे पालन केले जाते. तालुक्यामध्ये शेळ्यांची संख्या १ लाख ३० हजार ३९५ आहे. शेळीबरोबर मेंढीपालन हा व्यवसाय केला जातो. तालुक्यात मेंढ्यांची संख्या ७७ हजार ९७६ आहे. मात्र चाऱ्याअभावी उपासमारीची वेळ आली आहे. मान्सून व अवकाळी पाऊस न झाल्यामुळे भीषण अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. रानातील खुरट्या गवताची उगवण झाली नाही. चाºयासाठी जनावरांना रानोमाळ वणवण भटकंती करावी लागत आहे.
पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर दुष्काळी दौºयावर आले असताना, पशुपालकांनी शेळया-मेंढ्यांसाठी चारा छावणी सुरु करण्याची मागणी केली होती. त्यानंतर दुष्काळग्रस्त आठ जिल्ह्यात शेळ्या-मेंढ्यांसाठी छावण्या सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने पावसाच्या तोंडावर घेतला. पशुसंवर्धन विभागाने पशुगणनेची माहिती वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली होती, मात्र फक्त मोठ्या जनावरांसाठी छावण्या सुरू झाल्या. लहान जनावरांचा विचार झाला नाही.
शेळ्या-मेंढ्या छावणीचा मुद्दा सर्वप्रथम २०१० मध्ये चर्चेत आला होता. त्यावेळी सरकारने प्रतिजनावरावर पाच रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते. ही रक्कम फारच तोकडी असल्याने त्यावेळी लहान जनावरांच्या छावण्या सुरू झाल्या नाहीत. २०१२ व २०१५ मध्येही मोठ्या जनावरांच्या छावण्या सुरु झाल्या, मात्र त्यावेळेसही शेळ्या-मेंढ्यांच्या छावण्यांची चर्चा झाली नाही. आता तब्बल नऊ वर्षानंतर त्यांच्या छावण्यांना मंजुरी दिली आहे. प्रति जनावरावर मिळणारे अनुदान वाढवून पंचवीस रुपये केले. परंतु पाऊस सुरू झाल्यानंतर आठ ते दहा-पंधरा दिवसात चारा उपलब्ध होईल. त्यामुळे हा निर्णय ऐतिहासिक असला तरी तो फसवा आहे, असे पशुपालकांचे म्हणणे आहे.
छावणीचालकांना : न परवडणाºया अटी
शेळ्या-मेंढ्यांसाठी प्रतिदिन २५ रुपयांचे अनुदान सरकारने जाहीर केले. ओला चारा, वाळलेला चारा, पशुखाद्य मुरघास हे त्यातच देणे छावणी चालकांना परवडणारे नाही. ऊस व उसाचे वाडे हिरवा चारा म्हणून देऊ नये, अशी अट सरकारने छावणीचालकांना घातली आहे. हिरवा चारा म्हणून देण्यासाठी मुरघास हा एकच पर्याय आहे. तो सहजासहजी मिळणे कठीण आहे.
प्रतिकूल स्थिती
चाºयाचा अभाव, वाढती उष्णता, पाणी समस्या यामुळे शेळ्या-मेंढ्यांच्या गर्भपाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच प्रतिकूल परिस्थितीमुळे गर्भधारणा होत नसल्याचे चित्र आहे.
पावसाला सुरुवात झाल्यास पंधरा दिवसांत लहान जनावरांसाठी चारा उपलब्ध होण्याची स्थिती आहे. शासनाने चारा छावण्या सुरु करण्याचे जाहीर केले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर हा निर्णय घेतला. जनावरे जगविणे अवघड झाले आहे. चारा छावणीचा निर्णय फक्त नादी लावण्यासाठी आहे.
- विठ्ठल कटरे, मेंढपाळ, तिल्याळ