शेरीनाला शुध्दीकरण योजनेच्या पाण्याची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 03:20 PM2019-05-10T15:20:19+5:302019-05-10T15:21:25+5:30
सांगली महापालिकेच्या शेरीनाला योजनेतून धुळगावमधील शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातो. पण योजनेच्या जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्ह तोडून पाण्याची चोरी होत आहे. पाणी चोरणाऱ्यांना जाब विचारल्यास त्यांच्याकडून धमकी, दमदाटीचे प्रकार होत आहेत. पाणी चोरीमुळे धुळगावमधील शेतकऱ्यांची पिके वाळू लागली असल्याची तक्रार गुरुवारी आयुक्तांकडे करण्यात आली.
सांगली : महापालिकेच्या शेरीनाला योजनेतून धुळगावमधील शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातो. पण योजनेच्या जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्ह तोडून पाण्याची चोरी होत आहे. पाणी चोरणाऱ्यांना जाब विचारल्यास त्यांच्याकडून धमकी, दमदाटीचे प्रकार होत आहेत. पाणी चोरीमुळे धुळगावमधील शेतकऱ्यांची पिके वाळू लागली असल्याची तक्रार गुरुवारी आयुक्तांकडे करण्यात आली.
धुळगाव येथील ग्रामस्थ डॉ. विनोद डुबल, भास्कर डुबल, सागर डुबल, श्रीकांत शिंदे, अजितसिंह डुबल, महंमद कामिरकर, नरेंद्र पाटील, श्रीकांत सूर्यवंशी, राजू देवर्षी, दामाजी डुबल, चंद्रकांत जाधव, सतीश जाधव, मौला मगदूम यांच्यासह शेतकऱ्यांनी आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, महापालिका शेरीनाला योजनेच्या धुळगावकडे जाणाऱ्या जलवाहिनीच्या एअर व्हॉल्व्हची आयुक्तांच्या आदेशानुसार दुरुस्ती केली होती. ती तोडून सध्या पाणीचोरी सुरु आहे. यामुळे मूळ लाभार्थी असलेल्या धुळगावच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी जात नाही. याबाबत ग्रामस्थांनी संबंधितांना विचारणा केली असता, त्यांच्याकडून धमकावले जात आहे.
दमदाटी, शिवीगाळ केली जात आहे. त्यामुळे संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. शेरीनाल्याची जलवाहिनी फोडून पाण्याची चोरी करणाऱ्यांविरोधात महापालिकेने पंधरा दिवसांपूर्वीच नोटिसा बजाविल्या होत्या. यात महापालिकेने पाणी चोरी केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पण प्रत्यक्षात महापालिका प्रशासनाने संबंधितांवर कसलीच कारवाई केलेली नाही. त्यामुळे पाणी चोरणाऱ्यांचे धाडस वाढले आहे.
एअर व्हॉल्व्हची दुरुस्ती केली असतानाही, ती तोडून पाण्याची चोरी होत आहे. त्यामुळे धुळगावमधील आॅक्सिडेशन पाँडपर्यंत शेरीनाल्याचे पाणीच पोहोचत नाही. या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात शेतीच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे.