शेटफळेतील वृत्तपत्र विक्रेता बनला सोसायटीचा अध्यक्ष;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:41 AM2020-12-12T04:41:52+5:302020-12-12T04:41:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क करगणी : इच्छाशक्ती मजबूत असेल, तर तो मनुष्य आयुष्यात अनेक संकटांवर मात करत यशस्वी वाटचाल करू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
करगणी : इच्छाशक्ती मजबूत असेल, तर तो मनुष्य आयुष्यात अनेक संकटांवर मात करत यशस्वी वाटचाल करू शकतो, याचे उत्तम उदाहरण आटपाडी तालुक्यातील शेटफळे गावचे वृत्तपत्र विक्रेते अशोक गायकवाड यांचे घ्यावे लागेल. वाचन संस्कृती वाढविण्यासह स्वतःच्या मुलांना उच्चशिक्षित करणे ते गावाच्या कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या विकास सोसायटीचे अध्यक्ष, असा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे.
शेटफळे विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी अशोक गायकवाड यांची गेल्या आठवड्यात निवड झाली. खरे तर एका सोसायटीचे अध्यक्ष होणे, सत्कार कार्यक्रम किंवा त्याची बातमी वृत्तपत्रात येणे याची जेवढी चर्चा होत नाही, तेवढी चर्चा अशोक गायकवाड यांच्या अध्यक्षपदी निवडीची झाली. अशोक गायकवाड यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक राहिला. जे मिळाले त्यात समाधानी राहणे, हीच त्यांची जीवनशैली. सुरुवातीला एका छोट्या पानटपरीपासून सुरू केलेला व्यवसाय अनेक संकटांमुळे त्यांना बंद करावा लागला. त्यानंतर वृत्तपत्र विक्री करत मुलांना उच्चशिक्षित बनवून त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले. असा त्यांचा खडतर प्रवास शेटफळेतील सर्वांनी पाहिला.
दरम्यान, अशोकराव गायकवाड यांनी १९९० च्या आसपास आपली वृत्तपत्र एजन्सी सुरू केली. पाच ते दहा अंकापासून ऊन, वारा, पाऊस, थंडीतही नित्यनियमाने त्यांनी घरोघरी वृत्तपत्र पोहोचवले. खरे तर अशोक गायकवाड याहीपेक्षा ते अशोक पेपरवाला या नावाने सर्वपरिचित आहेत. त्यांची अध्यक्षपपदी निवड झाल्याने सोशल मीडियावर त्यांच्या जीवनदायी प्रवासाची संघर्षमय कहाणी वाऱ्यासारखी पसरली आणि अनेकांनी त्यांच्या कार्याची पोहोचपावती मिळाल्याची भावना व्यक्त केली.
दरम्यान, एका सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड होणे, ही बाब खूप मोठी नसली तरी, निवड होणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीमुळे पदाला आलेले महत्त्व अधोरेखित होते.
फोटो-११
फोटो ओळ :
शेटफळे (ता. आटपाडी) येेथे वृत्तपत्र विक्रेते अशोकराव गायकवाड यांची सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सोमनाथ गायकवाड, वसंतराव गायकवाड यांनी त्यांचा सत्कार केला.