शेतकरी नमो सन्मान योजना: सांगली जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यांत ७८.६४ कोटी जमा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 07:18 PM2024-08-24T19:18:00+5:302024-08-24T19:18:56+5:30
राज्य शासनाचा ‘नमो सन्मान’चा चौथा हप्ता
सांगली : ‘शेतकरी नमो सन्मान’ योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हप्त्याची शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. दि. २२ ऑगस्टपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चौथा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेप्रमाणेच राज्य शासनाने ‘नमो सन्मान’ योननेतून दोन हजार रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळाली आहे. जिल्ह्यातील तीन लाख ९३ हजार २४९ शेतकऱ्यांच्या खात्यावर ७८ कोटी ६४ लाख ९८ हजार रुपये जमा झाले आहेत.
केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षातून दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचे तीन हप्ते मिळत आहेत. या योजनेचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होत असल्यामुळे केंद्राच्या धर्तीवरच राज्य सरकारने शेतकरी नमो सन्मान योजना गेल्या वर्षापासून सुरू केली आहे. पीएम किसान योजनेचे सर्व लाभार्थी शेतकरी नमो सन्मान योजनेसाठी पात्र केले आहेत.
त्यानुसार जिल्ह्यातील तीन लाख ९३ हजार २४९ शेतकऱ्यांना नमो सन्मान योजनेचा लाभ मिळत आहे. रक्षाबंधनाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झाले होते. त्यानंतर शेतकऱ्यांमधून नमो सन्मान योजनेचे पैसे कधी मिळणार, अशी विचारणा होत होती. शेतकऱ्यांच्या या मागणीची दखल घेऊन राज्य सरकारने दि. २२ ऑगस्टपासून चौथ्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत.
‘शेतकरी नमो सन्मान’चे लाभार्थी
तालुका - पात्र शेतकरी
आटपाडी - २६,३३२
जत - ६८,६७९
कडेगाव - ३१,९६३
क.महांकाळ - २८,४०८
खानापूर - २२,२२१
मिरज - ५२,३७४
पलूस - २२,६२४
शिराळा - ३६,०४२
तासगाव - ४०,२३९
वाळवा - ६४,३६७
एकूण - ३,९३,२४९