शेट्टी-खोत यांच्यात श्रेयाचे राजकारण दूध दरवाढीचा मुद्दा : केंद्रबिंदू इस्लामपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 11:46 PM2018-07-21T23:46:59+5:302018-07-21T23:47:57+5:30

Shetti-Khot's issue of politics of milk is an issue of milk price: At the central point of the Islamophobia | शेट्टी-खोत यांच्यात श्रेयाचे राजकारण दूध दरवाढीचा मुद्दा : केंद्रबिंदू इस्लामपुरात

शेट्टी-खोत यांच्यात श्रेयाचे राजकारण दूध दरवाढीचा मुद्दा : केंद्रबिंदू इस्लामपुरात

Next
ठळक मुद्देशेट्टींचे राष्ट्रवादीकडून स्वागत

अशोक पाटील ।
इस्लामपूर : दूध आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत खासदार राजू शेट्टी, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार जयंत पाटील, विनायकराव पाटील उपस्थित होते. मात्र या आंदोलनाचे श्रेय शेट्टी यांना जाऊ नये, यासाठी सदाभाऊ खोत यांनी दूध दरवाढीसाठी यापूर्वीच आपण प्रयत्न केल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे. श्रेयवादाच्या राजकारणामुळे इस्लामपूर हाच पुढील संघर्षाचा केंद्रबिंदू राहणार आहे.

गाईच्या दुधाला प्रतिलिटर २५ रुपये दर दूध संघांनी द्यावा, असा निर्णय नागपूर येथील बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खासदार शेट्टी यांचे अभिनंदन केले. दूध दराचे आंदोलन यशस्वी केल्याबद्दल इस्लामपूर येथे शनिवारी शेट्टी यांचे मिरवणुकीने जंगी स्वागत करण्यात आले. त्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांचाच सहभाग होता.

यातून रयत क्रांती आघाडीचे नेते व कृषी राज्यमंत्री खोत यांना शह देण्याचा प्रयत्न झाला. मात्र नागपूरमध्ये आंदोलनाची कोंडी फुटताच खोत यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट टाकली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपणच यापूर्वी दूध दर वाढीसाठी प्रयत्न केले आहेत, असे भासविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ही खेळी यशस्वी झाली नाही. त्यातच आंदोलन यशस्वी झाल्यामुळे रयत क्रांती आघाडी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली.
दूध आंदोलनातील स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा एकसंधपणा म्हणजे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची नांदी आहे, अशी चर्चा सध्या रंगली आहे.

याचा धसका रयत क्रांती आघाडी आणि भाजपच्या नेत्यांनी घेतल्याचीही चर्चा आहे. परिणामी हातकणंगले लोकसभा आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अनुक्रमे शेट्टी आणि जयंत पाटील यांच्यासाठी सोपी झाल्याचे चित्र आहे. दूध आंदोलनातील यशामुळे तर आणखी बळ मिळाले आहे. शेट्टींच्या आंदोलनातील यशाचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही आनंद झाला आहे. शेट्टी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा शत्रू एकच असल्यामुळे दोघांकडून भाजपला लक्ष्य केले जात आहे. प्रत्येकवेळी शेट्टींच्या धोरणाला राष्ट्रवादीकडून पाठिंबाही मिळत आहे. ही खेळी आगामी निवडणुकांत भाजपच्या नेत्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.भाजपचे नेते आणि सदाभाऊ खोत यांच्यासमोर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवाराचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आहे.

कार्यकर्ते रिचार्ज
राजू शेट्टी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच दूध दरवाढीचे आंदोलन यशस्वी केल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातून या संघटनेने आता विदर्भ, मराठवाडा परिसरात संघटनात्मक जाळे विणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

Web Title: Shetti-Khot's issue of politics of milk is an issue of milk price: At the central point of the Islamophobia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.