शेट्टींकडून सत्तेसाठी शेतकऱ्यांचा विश्वासघात
By admin | Published: October 14, 2015 11:25 PM2015-10-14T23:25:21+5:302015-10-15T00:35:38+5:30
पंजाबराव पाटील : एफआरपीसाठी बळिराजा संघटना रस्त्यावर उतरणार
इस्लामपूर : गेल्या दहा वर्षांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी ऊसदराची आंदोलने केली. तेच शेट्टी आता सत्ता, संपत्ती, मंत्रिपदाच्या लाभासाठी आंदोलनाला बगल देऊन शेतकऱ्यांचा विश्वासघात करीत आहेत, असा घणाघाती आरोप बळिराजा शेतकरी संघटनेचे नेते पंजाबराव पाटील यांनी बुधवारी केला.इस्लामपूर येथे न्यायालयीन कामकाजासाठी आल्यावर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, उसाच्या एफआरपीनुसार दर देण्यावरून सरकार, कारखानदारांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. खा. शेट्टी आता शेतकऱ्यांविषयी बेगडी कळवळा दाखवून मतदारसंघ टिकवून ठेवत आहेत. त्यामुळे एफआरपीसाठी बळिराजा संघटना रस्त्यावर उतरेल. प्रसंगी त्यासाठी न्यायालयाचे दरवाजेही ठोठावू.
पाटील म्हणाले की, मंत्री समितीच्या बैठकीत खा. शेट्टी सरकार व कारखानदारांच्या निर्णयाला मान्यता देतात. यावरून त्यांना आता शेतकऱ्यांशी काही देणे-घेणे नसल्याचे स्पष्ट होते. मंत्रिपदासाठी सरकारची मर्जी सांभाळताना ते आता शेतकऱ्यांच्या विश्वासघात करीत आहेत. निवडणुकीपूर्वी भाजपने ऊस आंदोलनातील खटले मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यावर काहीच निर्णय नाही. बी. जी. पाटील म्हणाले, जात, धर्म, पंथाच्या पलीकडे जाऊन काम करणारी चळवळ मोडण्याचे काम खा. शेट्टी व सदाभाऊ खोत करीत आहेत. शेतकऱ्याला किमान हमीभाव देता येणार नाही, असे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खा. शेट्टी मिठ्या मारत आहेत. मग ही मिठी शेतकऱ्यांना मारण्यासाठी आहे का? आघाडी सरकारच्या काळात खा. शेट्टी तीव्र आंदोलन करायचे. त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादीला बदनाम करण्याची सुपारी खा. शेट्टी यांनी भाजपकडून घेतली होती का? अशी शंका येते. सत्ता, संपत्तीच्या लाभासाठी ते भाजपच्या वळचणीला जाऊन बसले आहेत.
यावेळी चंद्रकांत जाधव, उत्तम साळुंखे, साजीद मुल्ला, बाबासाहेब मोहिते, अशोक सलगर, विक्रम थोरात, दीपक पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)
बांधकाम कामाची गुणवत्ता तपासावी
बी. जी. पाटील म्हणाले की, मोर्चा काढण्याच्या नावाखाली खा. शेट्टींकडून भावनेशी खेळ सुरू आहे. ऊस बिलातून शेतकऱ्यांचे पैसे कपात करण्यासाठी आ. जयंत पाटील व खा. शेट्टी यांचे साटेलोटे आहे. जिल्हा बँकेत दिलीप पाटील यांची भेट घेऊन हे कपातीचे कुभांड रचले गेले आहे. शेट्टी व जयंत पाटील यांच्या पिलावळीची बांधकाम खात्यात चलती आहे. त्यांच्याकडून होणाऱ्या बांधकामाची गुणवत्ता तपासली पाहिजे.