शेट्टी-खोत यांचा पेठनाक्यावर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 11:54 PM2017-08-30T23:54:45+5:302017-08-30T23:54:45+5:30
अशोक पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : खासदार राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील संघर्ष टिपेला गेला आहे. वाळवा-शिराळ्यातील राजकीय केंद्रबिंदू असलेल्या पेठनाक्यावर आपल्यालाच पाठिंबा मिळावा यासाठी दोघांनी जणू ठिय्या मारला आहे. परंतु नानासाहेब महाडिक आणि त्यांच्या पुत्रांनी दोघांनाही समान अंतरावर ठेवत, दोघेही आमचेच असल्याचा दावा केला आहे.
वाळवा-शिराळ्यात राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. वाळवा तालुक्यातील पेठनाका हे महाडिक गटाचे मुख्यालय याच मतदारसंघात येते. नानासाहेब महाडिक, त्यांचे पुत्र माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक यांच्या गटाची ताकद उल्लेखनीय असून, ते सध्या कोणत्याच पक्षात नाहीत. शिराळा व वाळवा विधानसभा मतदारसंघातील बहुतांशी गावात महाडिक यांचा गट कार्यरत आहे. इस्लामपूर, आष्टा शहरातही त्यांचे कार्यकर्ते आहेत. काही ग्रामपंचायतींवर त्यांची सत्ता आहे. त्यामुळे त्यांच्या गटाचा पाठिंबा आपल्यालाच मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मुंबई-दिल्लीकडे जाता-येता राष्टÑीय महामार्गावरील पेठनाक्यावरच्या भेटी वाढवल्या आहेत.
मात्र प्रत्येक विधानसभा निवडणुकीत आमदार जयंत पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार विलासराव शिंदे यांनी आपला फक्त वापरच करून घेतला आहे, अशी महाडिक यांची भावना आहे. शेट्टी यांच्या पाठीशीही महाडिक ठामपणे होते. आता मात्र त्यांच्यासमोर शेट्टी का खोत?, असा प्रश्न आहे. त्यातून त्यांनी आता स्वत:च्या पेठ जिल्हा परिषद मतदारसंघाच्या विकासासाठी शेट्टी आणि खोत यांना समान अंतरावर ठेवले आहे.
आमदार शिवाजीराव नाईक यांचीही दोघांशी जवळीक
शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार नाईक यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या विरोधात असणाºया सर्वच घटकपक्षांची व गटांची ताकद एकत्रित करून लढावे लागते. साखरसम्राटांच्या विरोधात असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचीही मदत त्यांना घ्यावी लागते. परंतु आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडली आहे. मात्र आ. नाईक यांनी भाजपसाठी सदाभाऊ खोत यांच्याशी मिळतेजुळते घेतले आहे. खोत यांच्या मदतीने मतदारसंघासाठी शासनाकडून निधी मिळवण्यावर त्यांनी भर दिला आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत खासदार शेट्टी यांची मिळालेली मदत न विसरता शेट्टी यांनाही त्यांनी जवळ ठेवले आहे.