शि. द. पाटील यांच्याशी कधीच मनोमीलन होणार नाही
By Admin | Published: December 15, 2014 10:48 PM2014-12-15T22:48:20+5:302014-12-16T00:11:30+5:30
संभाजी थोरात : शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी एकटाच समर्थ
वाटेगाव : शिक्षक संघाच्या कार्यकर्त्यांमुळेच मी मोठा झालो आहे. तुमचा प्रतिनिधी म्हणून शिक्षकांच्या प्रश्नांसाठी उपोषण करण्याची माझी तयारी आहे. फक्त तुमची साथ गरजेची आहे. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी एकटाच समर्थ आहे. या जन्मात तरी मी आणि शिवाजीराव पाटील एकत्र येणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजी थोरात यांनी केले.
वाटेगाव (ता. वाळवा) येथे झालेल्या शिक्षकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राज्य उपाध्यक्ष हंबीरराव पवार, जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, तालुकाध्यक्ष शिवाजी चव्हाण, सरचिटणीस वसंत शिंगारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
संभाजी थोरात म्हणाले, माहिती व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नजीकच्या काळात शिक्षकांच्या फायद्याची सर्व ती माहिती देण्याचे काम केले जाईल. अधिवेशन काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा करून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असल्याचेही त्यांनी सांगितले.
वाळवा पं. स. चे सभापती रवींद्र बर्डे म्हणाले, शिक्षकांनी शिक्षक संघटनांच्या माध्यमातून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत. शासन स्तरावर शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वते प्रयत्न करू, असे त्यांनी आश्वासन दिले.
यावेळी शि. द. पाटील गट व शिक्षक समितीमधून कृष्णात सूर्यवंशी, सतीश विरभक्त, शिवाजी पाटील, बाबासाहेब थोरात, शरद पाटील, बंडू बामणे, केंद्रप्रमुख नजमा पिरजादे या शिक्षकांनी संभाजी थोरात गटात प्रवेश केला.
यावेळी विभागीय अध्यक्षपदी तानाजी खोत, प्रमुखपदी अजित पाटील यांच्यासह शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कुमार बल्लाळ, नंदकुमार पाटील, दादासाहेब खोत, रमेश चव्हाण, शांताराम सपकाळ, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते. शिवाजी चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. सवंत शिंगारे यांनी स्वागत केले. गोपाळ पाटसुते यांनी आभार मानले. (वार्ताहर)
बँकेची निवडणूक स्वबळावर
राज्यात प्राथमिक शिक्षक संघाला लोकप्रियता आहे. म्हणूनच राज्यातील सर्व शिक्षकांनी प्राथमिक शिक्षक संघाच्या झेंड्याखाली एकत्र यावे. शिक्षक सभासदांचे आर्थिक संवर्धन करण्यासाठी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक स्वबळावर लढवणार आहे.