Sangli: बनावट कागदपत्रासाठी शिगावच्या 'गावडे युनिव्हर्सिटी'वर पुन्हा छापा, गावडे बंधूंसह सातजणांना अटक

By हणमंत पाटील | Published: June 25, 2024 11:43 AM2024-06-25T11:43:41+5:302024-06-25T11:46:18+5:30

विटा पोलिसांची कारवाई , बनावट कागदपत्रांचे साहित्य जप्त

Shigaon's 'Gawade University' raided again for fake documents, seven people including Gawde brothers arrested in sangli | Sangli: बनावट कागदपत्रासाठी शिगावच्या 'गावडे युनिव्हर्सिटी'वर पुन्हा छापा, गावडे बंधूंसह सातजणांना अटक

Sangli: बनावट कागदपत्रासाठी शिगावच्या 'गावडे युनिव्हर्सिटी'वर पुन्हा छापा, गावडे बंधूंसह सातजणांना अटक

विटा : विटा पोलिसांनी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या गावडे युनिव्हर्सिटीचा पर्दाफाश केला. बनावट कागदपत्रे बनविण्यासाठी आवश्यक असणारे लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर, लॅमिनेशन मशीन, मॉनिटर, वेगवेगळ्या प्रकाराचे कागद, बनावट सर्टिफिकेट, कोरे शाळा सोडल्याचे दाखले, बनावट बोर्ड सर्टिफिकेट, शिक्के, मार्क लिस्ट तयार करण्यासाठी लागणारे वेगवेगळ्या रंगाचे पेपर, वेगवेगळ्या मुलांचे बनावट सर्टिफिकेट असे साहित्य जप्त केले. तसेच, गावडे बंधूंसह सातजणांना अटक केली आहे.

विटा पोलिसांनी प्रमोद आमने (वय २९, रा. काळमवाडी, ता. वाळवा), शिवाजी यमगर (३१) व काकासाहेब लोखडे (३०, दोघेही रा. वाळवा), रामचंद्र गावडे (८२), अर्जुन गावडे (५२), गजानन गावडे (४३, तिघेही रा. शिगांव, ता. वाळवा) व महेश चव्हाण (५२, रा. पेठवडगांव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) या सातजणांना अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांनी दिली.

मेमाणे म्हणाले, “प्रमोद आमने याचे दहावीचे प्रमाणपत्र खोटे तयार करून पोस्टाचे डाकघर सहायक, डाकपाल शाखा नेवरी येथे नोकरी मिळवून दिली. त्यामुळे भारत सरकारची व डाक विभागाची फसवणूक झाल्याची फिर्याद विटा डाक निरीक्षक सुरेश काकडे यांनी विटा पोलिसांत दिली होती. त्याप्रमाणे या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केला. त्यावेळी प्रमोद आमने याने नोकरी मिळविण्यासाठी शिवाजी यमगर व काकासाहेब लोखडे यांना १ लाख २५ हजार रुपये दिले.

यमगर व लोखडे यांनी नोकरीचे आमिष दाखवून प्रमोद आमने यास रामचंद्र गावडे, अर्जुन गावडे व गजानन गावडे या गावडे बंधूंकडून बनावट बोर्ड सर्टिफिकेट दिल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तपासाला गती देऊन शिवाजी यमगर व काकासाहेब लोखडे यांच्याकडे विटा पोलिसांनी तपास केला. त्यावेळी शिवाजी यमगर व काकासाहेब लोखडे यांनी रामचंद्र गावडे, अर्जुन गावडे व गजानन गावडे यांनी वेगवेगळ्या मुलांचे शाळा सोडल्याचे दाखले तसेच बोर्ड सर्टिफिकेट, जन्म दाखला व इतर बनावट कागदपत्रे तयार करून दिल्याचे सांगितले.

बनावट कागदपत्रांची गावडे युनिव्हर्सिटी..

विटा पोलिसांनी या गावडे बंधूंना पोलिस कोठडीमध्ये घेऊन तपास केला. त्यावेळी अर्जुन गावडे व गजानन गावडे यांच्या घरी वेगवेगळ्या शाळा, कॉलेजच्या मुलांचे शाळेचे दाखले व बोर्ड सर्टिफिकेट तसेच वेगवेगळ्या शाखेचे डिग्री सर्टिफिकेट मिळून आल्याने ते जप्त केले. तसेच महेश चव्हाण हा संगणकमध्ये पारंगत असून, तो गावडे बंधूंना बनावट सर्टिफिकेट तयार करून देत असे. बनावट सर्टिफिकेट व बनावट कागदपत्रे तयार करून देण्यासाठी शिगांव (ता. वाळवा) येथील गावडे युनिव्हर्सिटी प्रसिद्ध असून, अनेक वर्षांपासून लोकांना बनावट कागदपत्रे तयार करून दिलेली आहेत. त्याच्या साहाय्याने नोकरी मिळाल्याची शक्यता आहे. रामचंद्र गावडे यांच्या विरोधात इस्लामपूरमध्ये गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Shigaon's 'Gawade University' raided again for fake documents, seven people including Gawde brothers arrested in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.