शिक्षक बँकेने दहा लाख रुपये कोविड कर्ज द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:18 AM2021-06-22T04:18:49+5:302021-06-22T04:18:49+5:30
संख : प्राथमिक शिक्षक बँकेने सर्वच सभासदांना राष्ट्रीयीकृत बँकांच्या कोविड कर्जाच्या धर्तीवर ६ टक्के व्याजाने १० लाख रुपये कर्ज ...
संख : प्राथमिक शिक्षक बँकेने सर्वच सभासदांना राष्ट्रीयीकृत बँकांच्या कोविड कर्जाच्या धर्तीवर ६ टक्के व्याजाने १० लाख रुपये कर्ज द्यावे. हे कर्ज १० वर्षांच्या दीर्घ मुदतीने द्यावे. बँकेने कोरोनाच्या नाजूक परिस्थितीत शिक्षकांना साथ द्यावी, अशी मागणी जत तालुका शिक्षक भारती संघटनेचे उपाध्यक्ष अविनाश सुतार यांनी पत्रकार परिषदेत केली.
सुतार म्हणाले, गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीमुळे शिक्षक आर्थिक विवंचनेत आहेत. काही शिक्षक व त्यांचे कुटुंबीय कोरोनाबाधित झाले. त्यांनी औषधोपचारासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे आर्थिक चणचण भासत आहे. कर्जरूपी मदतीमुळे बिघडलेली आर्थिक घडी सुरळीत होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे कोविड कर्ज देऊन शिक्षक बँकेने त्यांना आर्थिक हातभार लावावा.
शिक्षकांचे पगार वेळेवर होत नाहीत. बँकेचे व्याजदर हे दिवसावर अवलंबून आहेत. उशिरा होणाऱ्या पगारामुळे जास्तीचे व्याज भरावे लागते. बँकेने याचा सहानुभूतीने विचार करून सर्वच कर्जांची व्याजदर आकारणी मासिक करावी. शिक्षक बँक शिक्षकांसाठीच आहे. कर्ज वसुली शंभर टक्के आहे. कोविड कालावधीत सर्व कर्जांच्या व्याजदरात सवलती द्याव्यात.
तसेच बँकेमध्ये कोविडच्या नियमांच्या नावाने काही शाखांमध्ये सुरु असणारी मनमानी थांबवावी. यावेळी मल्लया नांदगाव, दिगंबर सावंत, जितेंद्र बोराडे, रावसाहेब चव्हाण, बाळासाहेब सोलनकर उपस्थित होते.