जत शहरामध्ये शिक्षक भवन उभारावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:26 AM2021-04-22T04:26:12+5:302021-04-22T04:26:12+5:30
ओळ : जत नगरपरिषद हद्दीत शिक्षक भवन उभारावे या मागणीचे निवेदन शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर यांनी नगराध्यक्षा शुभांगी ...
ओळ : जत नगरपरिषद हद्दीत शिक्षक भवन उभारावे या मागणीचे निवेदन शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर यांनी नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर यांना दिले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
संख : तालुक्यातील शिक्षकांना विविध कामानिमित्त जत शहरात यावे लागते. शिक्षकांना थांबण्यासाठी स्वतंत्र अशी हक्काची जागा नाही. त्यामुळे समस्यांना तोंड द्यावे लागते. शिक्षकांची एकत्र सोय व्हावी, यासाठी नगरपरिषद हद्दीत शिक्षक भवन बांधावे, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाच्या शि. द. पाटील गटाचे तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर यांनी नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की तालुक्यात प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांची संख्या मोठी आहे. तालुक्यात २ हजार ७०० शिक्षक कार्यरत आहेत. महिला व बाहेरील जिल्ह्यातील शिक्षकांची संख्या अधिक आहे. या शिक्षकांना विविध प्रशासकीय कामासाठी तालुक्याचे ठिकाणी यावे लागते. बैठका, गट संमेलन, शिक्षण परिषद, प्रशासकीय शिबिरे, चर्चासत्रे, शैक्षणिक कामे, विविध कार्यक्रम होत असतात. त्यावेळी मात्र या शिक्षकांना एकत्र बसण्यासाठी हक्काची जागा नाही. शिक्षकांना अडचणीचा सामना करावा लागताे. तालुक्यात शिक्षकांचे प्रशिक्षण घेणे. प्रशासकीय बैठका घेणे यासाठी शाळांचा वापर करावा लागतो. परिणामी तेथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात अडथळा निर्माण होतो. शिक्षकांच्या कार्यक्रमासाठी एक व्यासपीठ म्हणून जत नगरपालिका हद्दीत शिक्षक भवन बांधावे. त्याची देखभाल नगरपालिकेने करावी. बहुउद्देशिय भवनचा वापर इतरही कार्यक्रमासाठी करता येईल. संघटनेच्या मागणीचा विचार करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.
निवेदनावर भारत क्षीरसागर, शिक्षक संघाचे उपाध्यक्ष जैनुद्दिन नदाफ, कोषाध्यक्ष उत्तम लेंगरे, विष्णू ठाकरे, सुदाम करहाळे यांच्या सह्या आहेत.