शिवणी... शून्य लोकसंख्येचे गाव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2016 11:10 PM2016-04-22T23:10:44+5:302016-04-23T00:58:17+5:30
प्लेगच्या साथीमुळे गाव स्थलांतरित : शिराळ्यात विलीनीकरणाची मागणी
विकास शहा -- शिराळा
शून्य लोकसंख्या असलेले, मात्र महसुली उत्पन्न देणारे म्हणून शिराळा तालुक्यातील शिवणीची ओळख बनली आहे. ९० वर्षांपूर्वी प्लेगची साथ आली आणि येथील ग्रामस्थ शेजारच्या शिराळा गावात वास्तव्यास गेले. या गावच्या हद्दीत खातेदारांची घरे, जनावरांची शेड आहेत, पण गावठाण अस्तित्वात नसल्याने व अपेक्षित उत्पन्न नसल्याने ग्रामपंचायत नाही. हे गाव शिराळ्यात विलीन करावे, अशी मागणी प्रलंबित आहे.
शिवणी हे गाव शिराळ्यालगत अर्ध्या किलोमीटरवर आहे. १९१८ पूर्वी ते ५०० ते ५५० लोकसंख्येचे गाव होते. २९३.८७ हेक्टर क्षेत्रफळ असून, २७०.९८ हेक्टर क्षेत्र जमीन पिकाऊ आहे. त्यापैकी २५०.५९ हेक्टर बागायती आहे. ६.४२ हेक्टर अंतर्गत रस्त्यांसाठी अशी नोंद आहे. तेथे ३६२ खातेदार असून त्यांच्याकडून शासनाला दरवर्षी ६ हजार १२५ रुपये महसूल मिळतो. शिवणी गावठाणाचे क्षेत्र नऊ एकर दोन गुंठे एवढे अल्प आहे.
१९१८-१९ च्या दरम्यान प्लेग, पटकी, नारू या साथीच्या रोगांमुळे येथे मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली. शिराळ्यात जागा उपलब्ध असल्याने येथील सर्व कुटुंबे शिराळ्यात स्थलांतरित झाली. त्यांना आजही ‘शिवणीकर’ असे संबोधले जाते.
छत्रपती शिवाजी महाराजांना शिवणी येथे भुईकोट किल्ला बांधायचा होता. त्यासाठी त्यावेळी पांढरी मातीही आणण्यात आली होती. मात्र हा किल्ला येथे न होता शिराळ्याजवळ असणाऱ्या तोरणा ओढ्यानजीक दक्षिण बाजूस बांधण्यात आला. आजही या किल्ल्याचे अस्तित्व येथे पाहायला मिळते.
वतनदारांचे गाव म्हणून शिवणीची खास ओळख आहे. गावकामगार पोलीस पाटीलकी सुर्वे-पाटील यांच्याकडे होती. गावाची चावडी भैरवनाथ मंदिराच्या व्हरांड्यात होती. तिचे अस्तित्व आजही आहे. येथील खैरात पीर देवस्थानचे व्यवस्थापन मुजावर कुटुंबीयांकडे होते. शिवणीच्या परिसरात ‘फाट्यांचे फडे’ ही वनस्पती मोठ्या प्रमाणात होती. फड्यांचे डवंग असे येथील एका विभागास संबोधले जाते. ब्रिटिशांच्या काळात ही वनस्पती नष्ट करण्यात आली.
येथील भैरवनाथ मंदिरासमोर पूर्वेकडील बाजूस गुरू-शिष्य परंपरा असलेला नाथपंथीयांच मोठा मठ होता. तेथे मोठ्या प्रमाणात साधू रहात असत. ‘राधामनगिरी’ हे या मठाचे शेवटचे गुरू. शिवणी गावचा गोळा होणारा महसूल या मठास दिला जात असे. या मठाच्या परिसरात भले मोठे वडाचे झाड होते. आज त्याच्या पारंब्यापासून निर्माण झालेल्या दोन वडाच्या झाडांचे अस्तित्व जाणवत आहे. शिवणेश्वर, मारुती, भैरोबा, खैरतपूर दर्गा ही मंदिरे आजही अस्तित्वात आहेत.
शिवपरंपरा : अनेक इनाम वर्ग ३ ची देवस्थाने
शिवणी गावात शिवपरंपरा असणाऱ्या नाथपंथीयाचा मठ होता. या मठात गुरू-शिष्य परंपरा होती. या मठाच्या मठाधिपती पदासाठी हरिगीरी व रामगिरी या दोघांमध्ये वाद झाला. यावादामध्ये गुरू-शिष्य परंपरा संपली व सर्व साधुसंत संसारी झाले. या गावाचा महसूल या मठात दिला जायचा, मात्र या वादामुळे शिंदे सरकार यांना महसूल गोळा करण्याचा मक्ता दिला गेला. मठाधिपती वाद उच्च न्यायालयापर्यत पोहोचला होता. येथील शिवणेश्वर, मारूती, भैरोबा, खैरातपूर दर्गा यांना सरकार इनामवर्र्ग ३ ची सनद आहे. या गावात कदम, सुर्वे-पाटील, मुगावर गिरीगोसावी हेच वतनदार लोक राहत होते. शिराळा शहरात ११ मारूती मंदिरे आहेत. यापैकी शिवणीत आहे.
संभाजीराजांच्या सुटकेचे प्रयत्न शिवणीतून
छत्रपती संभाजी महाराजांना कैद झाली, त्यावेळी येथील असणारे मोठे डवंगामध्ये छत्रपतींना सोडविण्यासाठीचे नियोजन करण्यासाठी येथे आश्रय देण्यात आला होता आणि येथूनच बंडाचे नियोजन झाले, मात्र हे बंड फसले.