शिंदे गट-शिवसेनेतील वाद पेटला, इस्लामपुरात सेनेच्या माजी नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 06:40 PM2022-07-25T18:40:10+5:302022-07-25T18:53:35+5:30

लोखंडी रॉडने दोन्ही पाय आणि एक हात मोडला

Shinde group-Shiv Sena dispute, fatal attack on husband of former Sena corporator in Islampur | शिंदे गट-शिवसेनेतील वाद पेटला, इस्लामपुरात सेनेच्या माजी नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला

शिंदे गट-शिवसेनेतील वाद पेटला, इस्लामपुरात सेनेच्या माजी नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला

googlenewsNext

श्रीनिवास नागे

इस्लामपूर : येथील शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्रतिभा शिंदे यांच्या पतीवरच शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या कार्यकर्त्यांनी लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करत त्यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली. हा प्रकार आज, सोमवारी सकाळच्या सुमारास झाला. यामुळे शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही, शिंदे गटात सामील का होत नाही या राजकीय मतभेदातून हा हल्ला झाला असण्याची शक्यता चर्चेत होती.

शिवकुमार दिनकर शिंदे (४९, रा. हनुमान नगर, इस्लामपूर) असे जखमीचे नाव आहे. ते सेंटरिंग व्यावसायिक आहेत. प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयातून पुढील उपचारासाठी सांगलीला हलविण्यात आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवसेनेचे तालुकाप्रमुख सागर मलगुंडेसह इतर ६ अनोळखीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शिवकुमार शिंदे हे सकाळी दूध घेऊन आपल्या दुचाकीवरून मंत्री कॉलनीतून घरी निघाले होते.त्यावेळी वाटेत दबा धरून बसलेल्या ६ ते ७ जणांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यात त्यांचे दोन्ही पाय मोडले आहेत. तसेच एक हातसुद्धा मोडला आहे. पाठीत आणि डोक्यातही मारहाण झाली आहे. एका पायातून अतिरक्तस्राव झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनली होती. त्यामुळे त्यांना उपजिल्हा रुग्णालयातून हलविण्यात आले आहे. सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील सर्व हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक अनिल जाधव अधिक तपास करत आहेत.

नामांतराच्या मुद्द्यावरून मतभेद..!

प्रतिभा शिंदे या प्रभाग क्रमांक ४ मधून शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आल्या होत्या. पालिकेच्या सभागृहाची मुदत संपण्यापूर्वी अगोदर काही महिने शहराचे ईश्वरपूर असे नामकरण करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी झालेल्या विशेष सभेला प्रतिभा शिंदे या प्रकृतीच्या कारणास्तव उशीरा पोहचल्या होत्या. त्यावेळी त्यांना शिवीगाळ करण्यात आल्याची चर्चा होती. या वेळेपासून शिंदे या शिवसेनेच्या गटापसून अंतर राखून होत्या. त्यात आता शिंदे गटात येण्याचा प्रश्न उद्भवला असल्याची चर्चा होती.

Web Title: Shinde group-Shiv Sena dispute, fatal attack on husband of former Sena corporator in Islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.