अध्यक्षपदासाठी योजना शिंंदे यांना ग्रीन सिग्नल?

By admin | Published: June 26, 2016 11:18 PM2016-06-26T23:18:34+5:302016-06-27T00:39:42+5:30

तासगावमधील नेतृत्वाचा कस : सुमनताई पाटील यांचा पाठिंबा; स्रेहल पाटीलना ‘वाळव्या’ची पसंती; गुंता कायम

Shinde has a green signal for president's post | अध्यक्षपदासाठी योजना शिंंदे यांना ग्रीन सिग्नल?

अध्यक्षपदासाठी योजना शिंंदे यांना ग्रीन सिग्नल?

Next

तासगाव : जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद तासगाव तालुक्याला देण्याचा निर्णय राष्ट्रवादीकडून निश्चित झाला आहे. अध्यक्षपदाचे नाव सुचविण्याचे सर्वाधिकार आमदार सुमनताई पाटील यांना देण्यात आले आहेत. मात्र तरीदेखील अध्यक्षपद कोणाला मिळणार? याचा तिढा सुटलेला नाही. योजना शिंंदे यांच्या नावाला आमदार सुमनतार्इंनी हिरवा कंदील दाखविल्याची चर्चा तालुक्याच्या राजकीय वर्तुळात आहे. मात्र वाळवा तालुक्यातून स्रेहल पाटील यांना पसंती असल्याची चर्चाही होत आहे. त्यामुळेच अध्यक्षपद जाहीर करण्यासाठी कसरत करावी लागत असून, पदाबाबतचा गुंता वाढत असल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यात विशेषत: तासगाव तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून लाल दिव्याची मोठी चर्चा सुरू आहे. तत्कालीन अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांच्या राजीनाम्यानंतर या चर्चेला वेग आला आहे. अध्यक्षपदाची संधी कोणाला मिळणार? याच प्रश्नाभोवती सर्व चर्चा फिरत आहे. अध्यक्षपदासाठी तालुक्यातून मणेराजुरीच्या योजना शिंंदे, येळावीच्या स्रेहल पाटील आणि सावळजच्या कल्पना सावंत यांच्या नावाची चर्चा होत आहे. या तीनही सदस्य आणि त्यांच्या समर्थकांनी अध्यक्षपदासाठी जोरदार लॉबिंग सुरु केले आहे.
राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेतृत्व आमदार जयंत पाटील यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयावरच अध्यक्षपदाची समीकरणे अवलंबून असल्याची चर्चा होत आहे, तर अध्यक्षपद तासगाव तालुक्याला मिळणार असल्याने आमदार पाटील यांनी अध्यक्षपदाचे नाव निश्चित करण्याचे अधिकार आमदार सुमनतार्इंना दिले असल्याचेही जाहीर केले आहे. मात्र अध्यक्षपद कोणाला मिळणार? याबाबत गुंतागुंत वाढत चालली आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवरच फेब्रुवारीत होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे तालुक्याचे समीकरण अवलंबून राहणार आहे, हे निश्चित आहे. एका जिल्हा परिषद गटात संधी दिल्यानतंर, दोन गटात काहीशी नाराजी राहणार आहे. मात्र संधी देताना येणाऱ्या निवडणुकीचा विचार करुन निर्णय घेतला जाणार, हे निश्चित आहे. येळावी जिल्हा परिषद गटात विद्यमान सदस्या स्रेहल पाटील यांच्या गटाला ग्रामपंचायत निवडणुकीत साफ अपयश आले होते, तर बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसच्या विजयअण्णा पाटील यांच्या गटाशी जवळीक साधली होती. त्यामुळे इथले आगामी जिल्हा परिषदेचे चित्र वेगळे असू शकते, अशी चर्चा आहे.
सावळज जिल्हा परिषद गटातील सदस्या कल्पना सावंत यांच्या गटालाही ग्रामपंचायत निवडणुकीत स्वत:चे अस्तित्व दाखवून देता आले नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांशी युती करून ग्रामपंचायतीत सत्तांतर घडवून आणले. मात्र नंतर भाजपने राष्ट्रवादीला बाजूला सारुन एकहाती वर्चस्व ठेवले. तर याठिकाणी राष्ट्रवादीचे पंचायत समितीचे सदस्य चंद्रकांत पाटील यांचा गट सक्षम आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीसाठी ही जमेची बाजू ठरणार आहे.
अध्यक्षपदाच्या प्रबळ दावेदार असणाऱ्या मणेजराजुरी गटात गतवेळच्या निवडणुकीत मोठी उलथापालथ झाली होती. आबा-काका गटाच्या ऐक्य एक्स्प्रेसमध्ये या गटातून काका गटाचे उमेदवार रिंगणात होते. मात्र याठिकाणी आबा गटाच्या उमेदवारांनी बंडखोरी केली होती. जिल्हा परिषदेच्या सदस्या योजना शिंंदे यांच्यासह दोन पंचायत समितीचे सदस्य अपक्ष निवडून आले होते. त्यामुळेच शिंंदे यांना अध्यक्षपद मिळू नये, यासाठी भाजपने जोर धरल्याची चर्चा आहे. तर भाजपला चपराक देत, आगामी निवडणुकीत मणेराजुरी गट भक्कम करण्यासाठी या ठिकाणी अध्यक्षपदाची संधी मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. अध्यक्षपदाबाबत तालुक्याचा निर्णय असतानादेखील एकमत होताना दिसत आहे. (वार्ताहर)

निर्णय कोणाचा? : जिल्ह्यात चर्चेला उधाण
आमदार जयंत पाटील यांनी सुमनतार्इंना अध्यक्ष निवडीचे सर्वाधिकार दिले आहेत. त्यानुसार निर्णय झाल्यास योजना शिंंदे यांचे अध्यक्षपद निश्चित मानले जात आहे. मात्र अध्यक्ष निवडी पडद्याआड घडामोडी झाल्यास येळावीच्या स्रेहल पाटील यांना संधी देऊन तालुक्यातील नेतृत्वाचा करेक्ट कार्यक्रम करण्याची खेळीही खेळली जाऊ शकते. निर्णयाचा केंद्रबिंदू तासगाव राहिल्यास योजना शिंंदे यांना, तर निर्णयाचा केंद्रबिंंदू इस्लामपूरकडे सरकल्यास स्रेहल पाटील यांना अध्यक्षपदाची संधी मिळू शकते. तशी खुलेआम चर्चा तालुक्याच्या राजकीय वर्तुळात होत आहे. तसे झाल्यास आगामी निवडणुकांत त्यांचे दूरगामी परिणाम जाणवू शकतात.


इस्लामपूरशी संधान
आमदार सुमनताई पाटील यांनी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली आहेत. योजना शिंंदे यांच्या नावाला सुमनतार्इंनी हिरवा कंदील दिला असल्याची चर्चा तालुक्यातील राजकीय गोटातून व्यक्त होत आहे. तर इच्छुक असलेल्या काही सदस्यांनी अध्यक्षपदासाठी इस्लामपूरशी संधान साधल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Shinde has a green signal for president's post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.