आष्ट्यात शिंदे-जयंतराव गटात धुसफूस

By admin | Published: May 9, 2017 11:43 PM2017-05-09T23:43:53+5:302017-05-09T23:43:53+5:30

आष्ट्यात शिंदे-जयंतराव गटात धुसफूस

In the Shinde-Jayantrao group, Dhasfus | आष्ट्यात शिंदे-जयंतराव गटात धुसफूस

आष्ट्यात शिंदे-जयंतराव गटात धुसफूस

Next


सुरेंद्र शिराळकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : राज्यातील उत्कृष्ट पालिका म्हणून दोन कोटी देऊन आष्टा पालिकेस नुकतेच गौरविण्यात आले. मात्र या कार्यक्रमाचे आमंत्रण सत्ताधारी गटातील काही नगरसेवकांसह विरोधी गटासही देण्यात न आल्याने, पालिका वर्तुळात धुसफूस सुरू आहे.
आष्टा पालिकेत कधी माजी आ. विलासराव शिंदे गटाची, तर कधी माजी ग्रामविकासमंत्री आ. जयंत पाटील गटाची सत्ता राहिली आहे. नव्वदच्या दशकात शिंदे-पाटील गटातील वाद विकोपाला गेला होता. मात्र त्यानंतर दोन्ही नेते एकत्र आले व बेरजेच्या राजकारणास सुरुवात झाली. दोन्ही गट पालिका निवडणूक एकत्र लढू लागले. आ. पाटील यांनी आष्टा पालिकेच्या चाव्या माजी आ. शिंदे यांच्याकडे दिल्या आहेत. आता पालिकेचा कारभार शिंदे पाहत आहेत. पालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी देण्याबाबत आ. पाटील गटास दिलेल्या जागा व उमेदवार ठरविणे, तडजोड करण्यासाठी दूत म्हणून जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील काम पाहतात. दिलीप पाटील व शिंदे यांच्या चर्चेतूनच उमेदवारी देण्यात आली आहे. या समझोत्यामुळेच २००६ ची निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले. १९ पैकी केवळ एक जागा विरोधी गटास देऊन पालिका बिनविरोध झाली. त्यानंतर २०११ व २०१६ ची निवडणूक दोन्ही गट एकत्र लढले. पालिकेत सत्ता आली, मात्र शिंदे गटाकडे वर्चस्व राहिले आहे. अध्यक्षपद शिंदे गटाकडे, तर दुसऱ्या व चौथ्या वर्षी उपनगराध्यक्षपद आ. पाटील गटास देण्यात येते. काहीवेळा विषय समिती सभापतीपद दिले आहे.
२०१६ च्या पालिका निवडणुकीत शिंदे गटाच्या स्नेहा माळी नगराध्यक्षपदी निवडून आल्या, तर विशाल शिंदे, रुक्मिणी अवघडे, सारिका मदने, जगन्नाथ बसुगडे, प्रतिभा पेटारे, विजय मोरे, पी. एल. घस्ते, झुंझारराव पाटील, शेरनवाब देवळे, संगीता सूर्यवंशी, पुष्पलता माळी, धैर्यशील शिंदे, मंगल सिद्ध, शैलेश सावंत, अर्जुन माने, शारदा खोत, मनीषा जाधव हे सत्ताधारी गटाचे उमेदवार विजयी झाले, तर विरोधी गटाचे वीर कुदळे, विमल थोटे, वर्षा अवघडे व अपक्ष तेजश्री बोन्डे विजयी झाल्या. स्वीकृत सदस्य म्हणून माजी नगराध्यक्ष मंगलादेवी शिंदे व शकील मुजावर यांची निवड झाली.
पालिकेच्यावतीने सुमारे २५०० घरकुले उभारण्यात आली आहेत. शहर शौचालययुक्त झाले आहे. तीर्थक्षेत्र योजनेतून सात महादेव लिंगांचा जीर्णोद्धार झाला आहे, तर काशिलिंग बिरोबा मंदिर जीर्णोद्धार सुरु आहे. भाजीपाला मंडई, फिश मार्केट काम पूर्ण झाले आहे. माजी आ. शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली कामे सुरु आहेत. २००३-०४ मध्ये संत गाडगेबाबा शहर स्वच्छता अभियानामध्ये आष्टा पालिका राज्यात द्वितीय आली होती. त्याचप्रमाणे यावर्षी आष्टा पालिका राज्यात उत्कृष्ट पालिका ठरली. पालिकेस दोन कोटीचे बक्षीसही मिळाले. पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना बक्षीस स्वीकारण्यास मुंबईत बोलावले. मात्र सत्ताधारी गटातील शिंदे गट वगळता आ. जयंत पाटील गट व विरोधी गटाच्या नगरसेवकांना आष्टा पालिकेस मिळालेल्या पुरस्काराबाबत कळवण्यातही आले नाही अथवा मुंबईत येण्याचे आमंत्रणही देण्यात आले नाही. याबाबत पालिका वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. काही नगरसेवकांत धुसफूस आहे. मात्र उघडपणे कोणी बोलण्यास तयार नाही.

Web Title: In the Shinde-Jayantrao group, Dhasfus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.