शिंदे साहेब, डोन्ट वरी, मैं हंू ना..!
By admin | Published: June 6, 2017 12:29 AM2017-06-06T00:29:18+5:302017-06-06T00:29:18+5:30
जयंत पाटील : साखराळेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांना ‘समाज भूषण’ पुरस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क --इस्लामपूर : ‘कोणी कोठेही जा, आम्ही येणाऱ्या कोणत्याही संकटास सामोरे जाण्यास सज्ज आहोत’, अशा शब्दात माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांना टोला लगावला. याचवेळी त्यांनी ‘शिंदे साहेब, डोन्ट वरी, मंै हूं ना..!’ असे म्हणत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार विलासराव शिंदे यांना धीर दिला.
साखराळे (ता. वाळवा) येथे स्वातंत्र्यसेनानी शामराव पाटील, लोकविकास मंडळाच्यावतीने विलासराव शिंदे यांचा ‘समाज भूषण’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला़ यावेळी ते बोलत होते. शिंदे यांचे पुत्र वैभव शिंदे यांच्या भाजप प्रवेशानंतरची ही पहिलीच सभा होती. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.़ मोहनराव कदम यांचा विशेष सत्कार तसेच जवाहर सार्वजनिक वाचनालयाच्या स्वा़ सै़ शामराव पाटील सभागृहाचे उद्घाटनही करण्यात आले़ य. मो. कृष्णा साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ़ सुरेश भोसले अध्यक्षस्थानी होते़ प्रा़ शामराव पाटील, विनायक पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बी़ के. पाटील, राजारामबापू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील, बाजार समितीचे सभापती आनंदराव पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थित होती.
आमदार पाटील म्हणाले की, मी व शिंदे यांनी टोकाचा संघर्ष बाजूला ठेवून तालुक्याच्या विकासाला चालना दिली़ १९९५ पासून आपल्याकडे जिल्हा परिषदेची सत्ता होती़ सध्या वेगळ्या विचाराचे लोक सत्तेत आले आहेत़ मोहनराव कदम यांनी ऐकले असते तर हे घडले नसते़ सध्या वाईट दिवस असले तरी, आम्ही घाबरून मागे हटणार नाही़ या परिस्थितीशीही समर्थपणे दोन हात करू़
विलासराव शिंदे म्हणाले की, मी व जयंतराव संघर्ष बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र आलो़ सध्या माझा मुलगा भाजपात गेला आहे़ हा आपणासाठी संक्रमणकाळ आहे़ माझे व मोहनराव कदम यांचे कधीच बिनसले नाही आणि आता त्यांचे व जयंतरावांचे चांगले ‘ट्युनिंग’ जुळले आहे़
डॉ़ भोसले म्हणाले की, चांगल्या माणसांनी चांगल्या कामासाठी प्रसंगी राजकारण बाजूला ठेवून एकत्र यायला हवे़ सहकार हा समाजाला आर्थिक स्थैर्य देणारा मार्ग असून, हा मार्गच धोक्यात येणार असेल, तर आपण कोणत्या मार्गाने पुढे जायचे? अलीकडे विचार मागे पडून राजकारण व्यक्तिकेंद्रीत बनले आहे़
आ. कदम म्हणाले की, जयंतराव चिंता करू नका, जिल्हा दुरूस्त होईल़ आपण काम करणारे आहोत, त्यामुळे काही अडचण येणार नाही़
याप्रसंगी कामेरीचे प्रा़ अनिल पाटील, सभापती सचिन हुलवान यांनीही मनोगत व्यक्त केले़ वाचनालयाचे अध्यक्ष शशिकांत पाटील, संदीप यादव, सौ़ रंजना माने, सौ़ आशा पाटील, अशोक बाबर यांचाही सत्कार करण्यात आला.
मंडळाचे अध्यक्ष जयकर पाटील यांनी स्वागत केले. वाचनालयाचे उपाध्यक्ष प्रा़ डॉ़ सूरज चौगुले यांनी प्रास्ताविक केले़ याप्रसंगी उपसभापती नेताजीराव पाटील, लिंबाजी पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, सुरेश गावडे, अॅड़ विश्वासराव पाटील, संपतराव पाटील, अल्लाउद्दीन चौगुले, पं़ स़ सदस्य आनंदराव पाटील, संजय पवार, रूपाली सपाटे, धोंडीराम जाधव, आनंदराव मोहिते, सुनील कणसे, माणिकदादा पाटील, रंगरावदाजी पाटील, रघुनाथ मदने, छाया पाटील उपस्थित होत्या. वाचनालयाचे कार्याध्यक्ष किरण पाटील यांनी आभार मानले.
राज्य शासनाकडून कुटिल डाव
शेतकऱ्यांच्या संपावरून राज्याचे लक्ष विचलित करण्यासाठीच राज्य शासन राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या चौकशीचा कुटिल डाव खेळत आहे, असा आरोप आमदार जयंत पाटील यांनी केला.