शिंदेवाडीत भीषण आग
By admin | Published: April 24, 2017 11:59 PM2017-04-24T23:59:18+5:302017-04-24T23:59:18+5:30
शिंदेवाडीत भीषण आग
कवठेमहांकाळ/देशिंग : शिंदेवाडी (हिंगणगाव, ता. कवठेमहांकाळ) येथे भरदुपारी ऊसतोडणी मजुरांच्या वस्तीवर अचानक आग लागून ३१ झोपड्या जळून खाक झाल्या. आगीत नऊ शेळ्या मृत्युमुखी पडल्या असून, एक दुचाकी, तीन सायकली, रोख रकमेसह संसारोपयोगी साहित्याचे सुमारे १३ लाखांचे नुकसान झाले. ही घटना सोमवारी दुपारी अडीच वाजता घडली.
जत तालुक्यातील मोटेवाडी, पांडोझरी या भागातून ऊसतोडणी मजुरांची ८० कुटुंबे शिंदेवाडी परिसरात गेल्या तीन वर्षांपासून राहत आहेत. ऊस हंगाम संपल्यानंतर परिसरातील द्राक्षबागा, शेतात मजुरी करून या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. गावापासून जवळच असलेल्या माळावर या कुटुंबांनी झोपड्या उभ्या केल्या आहेत. सोमवारी सर्वजण मजुरीसाठी गेले असताना, दुपारी अडीचच्या सुमारास येथील एका झोपडीस आग लागली.
एकमेकांना खेटून असलेल्या सर्वच झोपड्या एकापाठोपाठ एक पेटत गेल्या. आगीत मजुरांचे सर्व संसारोपयोगी साहित्य, रोख रक्कम जळून खाक झाली. या झोपड्यांमध्ये तीस शेळ्या होत्या. यातील एकवीस शेळ्यांना वाचविण्यात यश आले, तर नऊ शेळ्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. याशिवाय रोख रक्कम, दुचाकी, तीन सायकली, धान्य असे सुमारे १३ लाखांचे नुकसान झाले. सुमारे ३१ झोपड्या आगीत खाक झाल्या.
आगीची माहिती गावात समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीने रौद्र रूप धारण केल्याने आग आटोक्यात आणणे कठीण झाले होते. यामुळे मोठे नुकसान झाले.
गावकामगार तलाठी रुपनर यांनी घटनेचा पंचनामा केला. यामध्ये एकूण तेरा लाखांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. घटनास्थळी सरपंच चंद्रकांत कवठेकर व ग्रामस्थांनी या मजुरांना चटई, धान्य, कपडे व संसारोपयोगी साहित्याची मदत केली. (वार्ताहर)