शिराळा विधानसभा मतदारसंघात आघाडीच्या नेत्यांनी मताधिक्य राखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 05:23 PM2019-05-31T17:23:51+5:302019-05-31T17:27:36+5:30
लोकसभा निवडणुकीत शिराळा विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या गावांमध्ये राजू शेट्टींना मताधिक्य दिले, तर शिराळा शहरातून धैर्यशील माने यांना मताधिक्य देण्यात आमदार नाईक गटाला यश आले. शिराळा शहर वगळता बहुतांश ग्रामीण भागात शेट्टी यांना मताधिक्य मिळाले आहे.
विकास शहा
शिराळा : लोकसभा निवडणुकीत शिराळा विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या गावांमध्ये राजू शेट्टींना मताधिक्य दिले, तर शिराळा शहरातून धैर्यशील माने यांना मताधिक्य देण्यात आमदार नाईक गटाला यश आले. शिराळा शहर वगळता बहुतांश ग्रामीण भागात शेट्टी यांना मताधिक्य मिळाले आहे.
शिराळा मतदारसंघात शिराळा तालुक्यासह वाळवा तालुक्यातील ४८ गावांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सम्राट महाडिक, अभिजित पाटील हे वाळवा तालुक्यातील नेते, तर आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख या नेत्यांत अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपड सुरू होती.
राज्याचे कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मरळनाथपूर या गावाचाही या मतदारसंघात समावेश आहे. या गावात धैर्यशील माने यांना आघाडी मिळाली. त्यांना ४५६ मते मिळाली, तर राजू शेट्टी यांना १९८ मते मिळाली.
चिखली हे आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे गाव. येथे माजी आमदार नाईक गटाने बाजी मारली. राजू शेट्टी यांनी ३६८ मतांचे मताधिक्य घेतले आहे, तर कोकरूड या सत्यजित देशमुख यांच्या गावात १२५१ मतांचे मताधिक्य राजू शेट्टी यांना मिळाले आहे.
शिराळा शहरात माजी आमदार मानसिंगराव नाईक यांची ताकद आहे; मात्र यावेळी आमदार नाईक गटाने धैर्यशील माने यांना ५५९ मतांचे मताधिक्य दिले आहे. याला कारणीभूत शिराळा नागपंचमी विषय ठरला आहे.
नागपंचमीबाबत येथील नागरिकांचे शिष्टमंडळ राजू शेट्टी यांना भेटण्यासाठी दिल्लीत गेले होते. यावेळी शेट्टी यांनी शिष्टमंडळाला चांगली वागणूक दिली नाही, अशी व्हीडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. याचा फटका बसल्याने येथे माने यांना मताधिक्य मिळाले.
बिऊर हे भाजपचे तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील यांचे गाव आहे. येथे त्यांच्या गटाची सत्ता आहे. मात्र येथे राजू शेट्टी यांना ४१७ मतांचे मताधिक्य मिळाले आहे. वाळवा तालुक्यातील कासेगाव हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे गाव आहे. येथे शेट्टी यांना २२५२ मताधिक्य मिळाले आहे.
पेठ येथे नानासाहेब महाडिक यांचे वर्चस्व आहे. येथे चुरशीने प्रचार केल्याने फक्त १०८ मते शेट्टी यांना जास्त मिळाली. येलूर हे सम्राट महाडिक यांचे गाव आहे. याठिकाणी माने यांना ६१६ मतांचे मताधिक्य मिळाले. चिकुर्डे हे शिवसेनेचे अभिजित पाटील यांचे गाव आहे. येथे शेट्टी यांना १९२ मतांचे मताधिक्य मिळाले आहे. कुरळप हे राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांचे गाव आहे. येथे राजू शेट्टी यांना ८८२ इतके मताधिक्य मिळाले.
शिराळा तालुक्याने ११ हजार ५३३, तर वाळवा तालुक्याने ९५०९ असे २१ हजार ४२ मतांचे मताधिक्य राजू शेट्टी यांना मिळाले आहे. तर वंचित आघाडीचे उमेदवार अस्लम सय्यद यांना १० हजार २२२, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांना ६०७ मते मिळाली आहेत.