शिराळा बाह्यवळण रस्त्यावरील पूल मृत्यूचे सापळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:20 AM2021-06-06T04:20:24+5:302021-06-06T04:20:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : येथील पेठ-कोकरूड बाह्यवळण रस्ता शिराळा व कोकरूडकरांसाठी दळणवळणाचा मुख्य मार्ग आहे. या रस्त्यावर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : येथील पेठ-कोकरूड बाह्यवळण रस्ता शिराळा व कोकरूडकरांसाठी दळणवळणाचा मुख्य मार्ग आहे. या रस्त्यावर लहान-मोठे पूल व नाले आहेत. रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण सुरू आहे. मात्र, त्यात लहान-मोठे पूल व नाल्यांवरील पुलांचे रुंदीकरण झालेले नाही. बाह्यवळण रस्त्यावरील एक पूल तर मृत्यूचा सापळा बनला आहे.
प्रहार संघटनेचे श्रीराम नांगरे पाटील यांनी याबाबत आवाज उठवला असून, हा प्रकार अत्यंत धोकादायक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. बांधकाम विभाग लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम करत असून, यामुळे कोणाच्याही जीवितास हानी झाली तर संबंधित विभागावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
याबाबत नांगरे यांनी संबंधित रस्त्याचे काम करणाऱ्या स्थापत्य अभियंत्यांना जाब विचारला. रस्त्याचे अंदाजपत्रक मिळाले आहे, पुलाचे नाही, असे उत्तर अभियंत्यांनी दिले. या पुलाच्या कठड्यामुळे तीन-चारवेळा अपघातही झाला आहे. या कामावर सार्वजनिक बांधकाम उपविभाग, इस्लामपूर व प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे, असे सांगितले.