शिराळा-वाळवा तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावेत
By admin | Published: November 3, 2015 11:09 PM2015-11-03T23:09:45+5:302015-11-04T00:08:28+5:30
शिवाजीराव नाईक : विरोधकांना निवडणुकीत झोपवलेय
कोकरूड : शिराळा व वाळवा तालुक्यातील गावे टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करून या गावांना दुष्काळाच्या सवलती जाहीर कराव्यात, अशी मागणी आमदार शिवाजीराव नाईक यांनी शिराळा येथे पत्रकार बैठकीत केली.
आमदार नाईक म्हणाले की, चांदोली धरण यावर्षी शंभर टक्के भरलेले नाही. पावसाळ््यात प्रारंभीचे काही दिवस सोडले, तर दोन ते अडीच महिने कोरडे गेले. या दोन्ही तालुक्यात डोंगर-उताराची जमीन, सिंचनाच्या अपुऱ्या सोयी असल्याने पावसाचे पाणी वाहून गेले. आम्ही तहसीलदार, प्रांत तसेच जिल्हाअधिकारी व कृषी व पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांना निवेदन देऊन काही गावांना टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करावे, अशी मागणी केली आहे. पाटबंधारे विभाग, वारणा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून वारणा नदीचे पाणी वाकुर्डेच्या खिरवडे, हात्तेगाव व डावा कालव्यातून रिळेपर्यंत सोडण्यासंदर्भात विनंती केली आहे.
आमदार नाईक म्हणाले की, खरीप पिकांची वाढ व्हायची असेल तर, सातत्याने पाऊस पडावा लागतो; मात्र तो न झाल्याने या दोन्ही तालुक्यातील भात, सोयाबीन, मका, भुईमूग, नाचणी, उडीद, तूर, हायब्रीड ही पिके वाया गेली आहेत. प्रशासनाने या पिकांची केलेली नजरपाहणी अत्यंत चुकीची असून, प्रत्यक्ष शेतावर जाऊन वस्तुनिष्ठ सर्व्हे करावा व त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल जाहीर करावा.
आमचे विरोधक शे-दीडशे लोकांचा मोर्चा काढून शेतकऱ्यांचा कळवळा आल्याचा आव आणून आमच्यावर टीका करतात. त्यांना आम्ही प्रशासकीय पातळीवर काय प्रयत्न केले आहे, याची माहिती घेण्याचेही भान नाही. खोटेनाटे सांगून ते आपण जागरुक असल्याचा आव आणत आहेत. मात्र त्यांना विधानसभा निवडणुकीत झोपवले आहे. ते तिसऱ्या क्रमांकावर गेले. ज्यांचे पुण्या-मुंबईत अस्तित्व असते, त्यांना यापुढे कायमचेच झोपवू. ज्यांनी उत्तर भागातील जनतेला सोन्याच्या कळशीतून पाणी मागू नये, असे सांगितले होते, त्यांना वाकुर्डे योजनेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असा टोला त्यांनी शिवाजीराव देशमुख यांना लगावला. (वार्ताहर)
गिरजवडे प्रकल्प आम्हीच पूर्ण करणार...
आमदार नाईक म्हणाले, गिरजवडे, मोंडेवाडी, मुळीकवाडी ही गावे वाकुर्डेचे पाणी जात नसल्याने पाण्यापासून वंचित राहत होती. त्यामुळे या गावांची शेती व पिण्याच्या पाण्याकरिता गिरजवडे तलावासाठी पाठपुरावा सुरू आहे. गिरजवडे प्रकल्पाचे आतापर्यंत १० कोटींचे काम झाले आहे. ठेकेदाराला फक्त दोन कोटी मिळाल्याने त्याच्या कामाची बिले थकली आहेत. येत्या आठ-पंधरा दिवसांत ठेकेदाराला बिले अदा होतील व गिरजवडे प्रकल्पाचे काम जोमाने सुरू होऊन हा प्रकल्प मे महिन्यापर्यंत मार्गी लागेल. तांत्रिक अडचणींमुळे हा निधी थांबला आहे. हा प्रकल्प आम्हीच मंजूर केला असून, तो आम्हीच पूर्ण करणार आहोत.