Sangli News: शिराळा येथील वनक्षेत्रपाल सचिन जाधव निलंबित, कामात वरिष्ठांची फसवणूक केल्याचा ठपका
By श्रीनिवास नागे | Published: February 28, 2023 01:37 PM2023-02-28T13:37:15+5:302023-02-28T13:37:59+5:30
निलंबन काळात जाधव यांना सांगली येथील उप वनसंरक्षक कार्यालयाच्या मुख्यालयात हजर राहण्याच्या सूचना
युनूस शेख
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील पोखर्णी येथे पुनर्वसन करण्यात आलेल्या झोळंबी वसाहतीमधील जमीन सपाटीकरण कामात मनमानी करताना वरिष्ठ अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत शिराळा येथील वनक्षेत्रपाल सचिन शंकर जाधव यांना निलंबित करण्यात आल्याचे आदेश सांगलीच्या उप वनसंरक्षक नीता कट्टे यांनी दिले आहेत.
शिराळा येथे वनक्षेत्रपाल म्हणून कार्यरत असणाऱ्या सचिन जाधव यांनी मौजे पोखर्णी (झोळंबी वसाहत ) ता. वाळवा येथील जमीन सपाटीकरणासाठीच्या कामांना उप कार्यकारी अभियंता, वारणा कालवे विभाग क्र. १ इस्लामपूर या कार्यालयाकडून तांत्रिक मान्यता न घेता परस्पर खोटे सही शिक्के वापरून व त्यावर सहया करून सदरची अंदाजपत्रके वरिष्ठ कार्यालयास मंजूरीसाठी सादर केल्याची तक्रार संभाजी ब्रिगेडचे राज्य सहसंघटक सुयोग औधकर यांनी केली होती.
या तक्रारीची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी केल्यावर वारणा कालवे विभागाच्या कार्यालयाकडून अशा कामाला कोणतीही मंजुरी देण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.त्यामुळे वन क्षेत्रपाल जाधव यांनी या कामात वरिष्ठ अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपिल नियम १९७९ अंतर्गत शिस्तभंगाची कार्यवाही करत निलंबनाची कारवाई झाली आहे. निलंबन काळात जाधव यांना सांगली येथील उप वनसंरक्षक कार्यालयाच्या मुख्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.