शिराळा, कोकरुड रुग्णालयातील यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:27 AM2021-05-06T04:27:02+5:302021-05-06T04:27:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : शिराळा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय आणि कोकरूड येथील ग्रामीण रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ...

Shirala, Kokrud Hospital system ready | शिराळा, कोकरुड रुग्णालयातील यंत्रणा सज्ज

शिराळा, कोकरुड रुग्णालयातील यंत्रणा सज्ज

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : शिराळा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय आणि कोकरूड येथील ग्रामीण रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे. फक्त शिराळा तालुक्यातीलच नव्हे, तर सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील काही रुग्णांचे प्राण वाचले आहेत.

या ग्रामीण व डोंगरी तालुक्यात आमदार मानसिंगराव नाईक यांनी प्रशासनासोबत काम करत योग्य नियोजन करून १२५ ऑक्सिजन बेड्‌स आणि त्यास आवश्यक ऑक्सिजनची व्यवस्था केली आहे. शिराळा उपजिल्हा रुग्णालय इमारतीचे उद्घाटन झाले आणि एक महिन्यातच कोरोना महामारी सुरू झाली. यावेळी तातडीने आमदार नाईक, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल यांनी या नवीन इमारतीत ७५ ऑक्सिजन बेड्‌सचे कोरोना सेंटर सुरू केले. पहिल्या लाटेत ३३२, तर दुसऱ्या लाटेत आजअखेर १०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

येथे रुग्ण वाढल्यावर कोकरूड ग्रामीण रुग्णालयात २५ ऑक्सिजन बेड्‌सचे कोरोना सेंटर सुरू केले. उपजिल्हा रुग्णालयात ६ मेट्रिक टन क्षमतेची ऑक्सिजन टाकी, २ ड्युरा सिलिंडर, ३७ जम्बो सिलिंडर, १८ छोटे सिलिंडर अशी ऑक्सिजन व्यवस्था आहे. आता स्वतःच्या खर्चाने २५ ऑक्सिजन बेड्‌सची व्यवस्था आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली आहे. खासदार धैर्यशील माने, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांनीही वारंवार भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली आहे. मुंबई आदी जिल्ह्यातून रुग्णांना बेड मिळत नाही, म्हणून अनेक रुग्णांनी येथे उपचार घेतले आहेत. काही घेत आहेत. पुढील उपचारासाठी बेड उपलब्ध होईपर्यंत सात प्राथमिक आरोग्य केंद्रांत २६ ऑक्सिजन बेड्‌स तयार केले आहेत.

चौकट

उपजिल्हा रुग्णालयात सोय

उपजिल्हा रुग्णालय

आजअखेर ६७३ कोरोना रुग्ण दाखल झाले असून कोरोनामुक्त रुग्ण ४३४, उपचारासाठी पुढे पाठवलेले १५५, सध्या उपचार घेत असलेले ४४ रुग्ण असून ३८ जणांचा मृत्यू झाला आहे.

चाैकट

कोकरूड ग्रामीण रुग्णालयात ८७ कोरोना रुग्ण दाखल झाले. यात कोरोनामुक्त २९ दाखल रुग्ण, १७ उपचारासाठी पुढे पाठवले, ४० जणांचा मृत्यू झाला. तालुक्यात आजअखेर रुग्णसंख्या ३७३८, कोरोनामुक्त २९७०, सध्याचे ॲक्टिव्ह रुग्ण ६४४, तर, एकूण मृत्यू १२४. पहिली लाट मृत्यू दर ३.३१, तर दुसरी लाट मृत्यू दर १.९१ असून आजअखेर आरटीपीसीआर चाचणी १०,८५२ व अँटिजेन चाचणी २३,२१५ करण्यात आल्या आहेत.

Web Title: Shirala, Kokrud Hospital system ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.