शिराळा नगरपंचायतीची निवडणूक लागली!
By admin | Published: May 5, 2017 11:37 PM2017-05-05T23:37:45+5:302017-05-05T23:37:45+5:30
शिराळा नगरपंचायतीची निवडणूक लागली!
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा नगरपंचायतीच्या निवडणुकीवरील बहिष्काराचा निर्णय शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना वगळता इतर राजकीय पक्षांनी झुगारून दिला. अवघ्या दोन तासांत सतरा जागांसाठी १४१ अर्ज दाखल झाले. त्यामुळे बहिष्कार आणि बिनविरोध निवडीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.
नागपंचमीदिवशी येथील जिवंत नागपूजेस परवानगी मिळावी, यासाठी नोव्हेंबरमध्ये झालेल्या नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीवर सर्व पक्षांनी बहिष्कार टाकला होता. त्यामुळे कोणीही निवडणूक प्रक्रियेत भाग घेतला नव्हता. मात्र, दि. ३१ डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावेळी झालेल्या वादामुळे बहिष्कार टाकणाऱ्यांमध्ये फूट पडली होती. काही राजकीय पक्षांनी बहिष्काराच्या निर्णयापासून फारकत घेतली. त्यानंतर हळूहळू बहिष्काराबाबतची तीव्रता कमी झाली. मात्र, राजकीय टीकाटिप्पणी वाढली होती. ते पाहून शिवसेनेने बहिष्काराचा निर्णय कायम असल्याचे निवेदन प्रसिद्ध दिले होते. इतर पक्षांचे नेते, कार्यकर्ते या निर्णयाबाबत शिराळ्याच्या नागरिकांसोबत असल्याचे सांगत होते. मात्र, त्यांची निवडणुकीची तयारी सुरू होती.
दि. २८ एप्रिलपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली.ोव्हा सर्वच पक्ष, संघटना व अपक्ष उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज भरण्यास प्रारंभ केला. शिवाय त्या अर्जांची तपासणीही निवडणूक अधिकाऱ्यांकडून करून घेण्यात येत होती. प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज दाखल केले नव्हते. शुक्रवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवस होता. दुपारी एकच्या दरम्यान एकाच वेळी १४ ते १५ उमेदवार अर्ज दाखल करण्यास आले. हे समजताच नगरपंचायतीत गर्दी उसळली. त्यानंतर अवघ्या दोन तासात १४१ उमेदवारी अर्ज दाखल झाले.
शहरात १७ प्रभाग असून १७ जागांसाठी १४१ अर्ज दाखल झाले आहेत. प्रभाग एक : ८ प्रभाग दोन : ९, प्रभाग तीन : ६, प्रभाग चार : ५, प्रभाग पाच : ६, प्रभाग सहा : ९, प्रभाग सात : ९, प्रभाग आठ : ८, प्रभाग नऊ : ८, प्रभाग दहा : १२, प्रभाग अकरा : १०, प्रभाग बारा : ५, प्रभाग तेरा : ७, प्रभाग चौदा : १६, प्रभाग पंधरा : ८, प्रभाग सोळा : ८, प्रभाग सतरा : ७, असे १४१ अर्ज दाखल झाले आहेत. यात प्रामुख्याने माजी उपसरपंच सुनील कवठेकर, माजी सदस्य शंकर कदम, अजय जाधव, अभिजित नाईक, विश्वप्रतापसिंह नाईक, छाया सदाकळे, गौतम पोटे, कुसूम निकम, सविता यादव, अर्चना कदम, कीर्तीकुमार पाटील, विक्रमसिंह नाईक, अॅड. नेहा सूर्यवंशी, संतोष देशपांडे, विद्याधर कुलकर्णी, केदार नलवडे, राम जाधव, सत्यजित कदम, नमिन मुजावर, सुनंदा सोनटक्के, सीमा कदम, ज्योती शेटे, स्रेहल जाधव, उत्तम डांगे, संभाजी नलवडे, सुनीता निकम, रूपाली कदम, अर्चना शेटे, अभिजित यादव आदी प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
एवढ्या मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्याने बहिष्कारासोबत निवडणूक बिनविरोध होण्याच्या चर्चेलाही पूर्णविराम मिळाला आहे. तहसील कार्यालय व परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील घोंगडे त्यावर लक्ष ठेवून होते.
शिवसेनेचा बहिष्कार कायम
मागीलवेळी निवडणूक जाहीर झाल्यानंतर बहिष्कार टाकण्याबाबतचे पहिले निवेदन शिवसेनेने प्रसिद्धीस दिले होते. यावेळीही शिवसेनेने बहिष्कार कायम ठेवून एकही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.
... आणि तणाव नाहीसा झाला !
दि. २८ एप्रिलपासून शुक्रवारी (दि. ५) दुपारी एकपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार दीपक शिंदे, सर्व अधिकारी व कर्मचारी उमेदवारी अर्ज कोण दाखल करतो, या प्रतीक्षेत होते. दुपारी एकच्या दरम्यान अर्ज भरण्यास उमेदवार आलेले पाहून या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरील ताण नाहीसा झाला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत:च्या कक्षाबाहेर येऊन याबाबत खात्रीही केली.