शिराळा नगरपंचायत राष्ट्रवादीकडे
By Admin | Published: May 26, 2017 02:49 PM2017-05-26T14:49:03+5:302017-05-26T14:49:03+5:30
शिराळा नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपला झटका देत राष्ट्रवादीने सत्ता मिळवली. १७ पैकी ११ जागा जिंकत राष्ट्रवादीने बाजी मारली असून, भाजपला ६ जागांवर समाधान मानावे लागले.
style="text-align: justify;">ऑनलाईन लोकमत
शिराळा, दि. 26 - शिराळा नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपला झटका देत राष्ट्रवादीने सत्ता मिळवली. १७ पैकी ११ जागा जिंकत राष्ट्रवादीने बाजी मारली असून, भाजपला ६ जागांवर समाधान मानावे लागले, तर काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. नागपंचमीदिवशी जिवंत नागपूजेस परवानगी मिळावी यासाठी सप्टेंबरमध्ये निवडणूक जाहीर झाल्यानंतर ग्रामस्थांनी व सर्वच पक्षांनी बहिष्कार घातला होता.
मात्र त्यानंतर बहिष्काराची तीव्रता कमी होत गेली. मार्चमध्ये पुन्हा निवडणूक जाहीर झाली. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी केवळ दोन तासात सर्वच पक्षांनी आणि अपक्षांनी अर्ज भरले. १७ जागांसाठी ५६ उमेदवार रिंगणात होते. भाजप, राष्ट्ररवादी व कॉँग्रेस या तीन पक्षांच्या उमेदवारांसह सहा अपक्षांनी मतदारांचा कौल अजमावला. राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक गटाचे प्राबल्य असलेल्या शिराळा शहराची पहिलीच निवडणूक असल्याने नगरपंचायतीवर पहिला झेंडा कोणाचा, तसेच पहिले नगरसेवक कोण, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बहुतांशी प्रभागांत तिरंगी लढत झाली.
बुधवार, दि. २४ रोजी चुरशीने ८७.५१ टक्के मतदान झाले. १०५१३ पैकी ९२०० मतदारांनी मतदान केले. तिन्ही पक्षांनी सत्तेचा दावा केला होता. शुक्रवार, दि. २६ रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू झाली. अवघ्या तासाभरात निकालही जाहीर झाला. माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली १७ पैकी ११ जिंकत राष्टÑवादीने सत्ता मिळवली. भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सम्राट महाडिक यांच्या ‘महाडिक युवा शक्ती’शी भाजपने हातमिळवणी केली होती. प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. विजयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.